नवी दिल्ली/प्रतिनिधी : बिहार राज्यातील 950 कोटी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेले आणि काही महिन्यापूर्वीच जामिनाव
नवी दिल्ली/प्रतिनिधी : बिहार राज्यातील 950 कोटी रुपयांच्या चारा घोटाळाप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेले आणि काही महिन्यापूर्वीच जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चारा घोटाळयातील पाचव्या घोटाळयात लालू यादव यांना पुन्हा एकदा सीबीआयच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे त्यांची तुरुंगवारी अटळ असल्याचे मानले जात आहे. याप्रकरणात शिक्षा 21 फेबु्रवारी रोजी सुनावण्यात येणार आहे.
लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डोरांड कोषागारातून 139 कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप लावण्यात आला होता. 1996 साली घडलेल्या या प्रकरणात लालू प्रसाद यादव मुख्य आरोपी होते. आता त्यांना दोषी ठरवल्याचा निर्णय रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिला आहे.1996 मध्ये बिहारमध्ये उघड झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 1997 मध्ये अटक देखील करण्यात आली होती. हा घोटाळा झाला, तेव्हा लालू प्रसाद यादवच बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर थेट 2013 मध्ये सीबीआय कोर्टाने चायबासा कोषागारातून बेकायदेशीररीत्या 37.67 कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी मानले. त्यांना पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याच वर्षी डिसेंबरमध्ये जामीन मंजूर केला. त्यानंतर पुन्हा 2017 मध्ये लालू यादव यांना देवघर कोषागारातून 89.27 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या पैसे काढण्याची एकूण पाच प्रकरणे चारा घोटाळा म्हणून जाहीर झाली होती. यापैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी सिद्ध झाले आहेत. देवगड, चायबासा, रांचीतील डोरांड आणि डमका कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालू यादव दोषी आढळले आहेत. बिहारच्या पशूसंवर्धन विभागात एकूण 950 कोटींचा चारा घोटाळा झाल्याचे 1996 मध्ये उघड झाले होते.
पुन्हा अटकेची शक्यता
लालू प्रसाद यादव यांनी गेल्या अनेक वर्ष तुरुंगात काढल्यानंतर तब्बेतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला आहे. मात्र चारा घोटाळयातील पाचव्या प्रकरणात त्यांना पुन्हा दोषी मानले आहे. याची शिक्षा लवकरच सुनावण्यात येणार असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच ते सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टात लालू प्रसाद यादव यांनी दाद मागितली होती. तेव्हा त्यांना अल्पसा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांना अटक होते की जामीन मिळतो, यासंदर्भातील चित्र काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
950 कोटींचा चारा घोटाळा
बिहारच्या पशुसंवर्धन विभागात हा 950 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. हा घोटाळा 1996 साली उघडकीस आला होता. तेव्हाचे बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे या घोटाळ्याचे प्रमुख आरोपी होते. 29 जून 1997 मध्ये लालूंविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. 12 डिसेंबर 1997 मध्ये त्यांची सुटकाही करण्यात आली. 28 ऑक्टोबर 1998 मध्ये त्यांनी पुन्हा अटक करण्यात आली. मार्च 2012 मध्ये सीबीआयकडून पुन्हा चारा घोटाळ्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. 2013 सालली लालूंना पुन्हा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली दरम्यान, सध्या लालू प्रसाद यादव हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुरुंगाबाहेर आहेत.
COMMENTS