सतराव्या आयपीएल पर्वाच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. याआधी कोलकाताने क्वालिफायर-१
सतराव्या आयपीएल पर्वाच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. याआधी कोलकाताने क्वालिफायर-१ मध्ये सनरायझर्सचा पराभव करून थेट फायनलमध्ये धडक मारली होती. यानंतर क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून सनरायझर्सने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. या मोसमात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. कोलकाताने तिन्ही सामन्यात हैद्राबादचा पराभव केला आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे आयपीएल इतिहासातील दोन सर्वात महागडे खेळाडू आपापल्या संघांना अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी ठरले. अशा परिस्थितीत या दोघांनाही त्यांच्या लौकीकाला जपणे गरजेचे होते. तथापि स्टार्कने आयपीएल २०२४ फायनलमध्ये किंवा संपूर्ण प्लेऑफमध्ये कमिन्सवर मात केली. अंतिम फेरीत स्टार्कने अवघ्या चौदा धावांत दोन विकेट्स घेतल्या. यामध्ये अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांच्या महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश आहे. त्याचवेळी कमिन्सला केवळ एकच बळी मिळाला. त्याने दोन षटकात अठरा धावा दिल्या. याशिवाय फलंदाजीत त्याने २४ धावाही केल्या.
आयपीएलच्या सतराव्या सत्राच्या लिलावात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होती. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. तर पॅट कमिन्सला सनरायझर्स हैद्राबादने २०.५० कोटी रुपयांना खरेदी केले. या मोसमात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये स्टार्क पंधराव्या स्थानावर आहे. त्याने चौदा सामन्यात सतरा विकेट्स घेतल्या. त्यावेळी त्याचा स्ट्राइक रेट १४.७६ इतका होता. तर इकॉनॉमी रेट १०.६१ होता. त्याच्या एका विकेटसाठी फ्रँचायझीला साधारणतः १.४५ कोटी रुपये मोजावे लागले. स्टार्कने क्वालिफायर-१ मध्ये सनरायझर्स विरुद्ध घातक गोलंदाजी केली आणि तीन विकेट्स घेतल्या. स्टार्कने मोठ्या सामन्यांमध्ये आपली कामगिरी बजावली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यश मिळवले.
तर दुसरीकडे सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने या मोसमात सोळा सामन्यात अठरा गडी बाद केले. त्याचा स्ट्राइक रेट २०.३३ आणि इकॉनॉमी ९.२७ असा होता. या मोसमात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये तो नवव्या स्थानावर राहिला. कमिन्सच्या एका विकेटसाठी फ्रँचायझीला जवळ जवळ १.१३ कोटी रुपये मोजावे लागले. या मोसमात कमिन्सने केवळ आपल्या गोलंदाजीनेच नव्हे तर काही सामन्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात फलंदाजीनेही छाप पाडली आहे. याशिवाय त्याने कर्णधारपदाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. एक कर्णधार म्हणून, कमिन्सला शेन वॉर्नला मागे सोडता आले नाही, जो आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अव्वल होता. वॉर्नने सन २००८ मध्ये राजस्थानचा कर्णधार असताना १९ विकेट्स घेतल्या होत्या. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नेतृत्व केलेल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात जिंकण्याची कमिन्सची संधी हुकली. आपणास आठवत असेलच सन २०२३ मध्ये कसोटीची विश्व अजिंक्यपद स्पर्धा व वनडे विश्वचषक याच कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवूनच जिंकल्या होत्या.
सन २०१५ च्या सत्रात स्टार्क स्वतःचा शेवटचा आयपीएल सामना खेळला होता त्यावेळी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये केकेआरने त्याला विकत घेतले, परंतु वैयक्तिक कारणांमुळे तो खेळू शकला नाही. आता त्याने आठ वर्षांनी पुनरागमन करत नेत्रदिपक कामगिरी केली. त्याच वेळी सनरायझर्सने खरेदी करण्यापूर्वी कमिन्स कोलकाताचा एक भाग होता. सन २०२० च्या लिलावात केकेआरने त्याला १५.५ कोटी रुपयांना विकत घेतले. नंतरच्या सत्रात कमिन्सला केकेआर या फ्रँचायझीने ७.२५ कोटी रुपयांना परत विकत घेतले आणि नंतरच्या सत्रात सोडले.
हैद्राबादच्या कर्णधाराने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या हंगामात त्यांची फलंदाजी ही हैद्राबाद संघाची ताकद आणि कमजोरीही ठरली. अशा स्थितीत अंतिम फेरीत कमिन्सने आपली फलंदाजी ही आपली ताकद मानून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैद्राबादची ही रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. केकेआरचा गोलंदाज मिचेल स्टार्कने प्रथम अभिषेक शर्माला बाद करून केकेआरला शानदार सुरुवात करून दिली. स्टार्कच्या एका चेंडूवर अभिषेक बाद झाला जो खेळणे कोणत्याही फलंदाजाला कठीण झाले असते.
फायनलमध्ये या विकेटसह स्टार्कने केकेआरने २४.७५ कोटी रुपये देऊन विकत घेतले हि चूक केली असे म्हणणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. मोठे खेळाडू मोठ्या सामन्यांमध्येच स्वतःला सिध्द करतात हे स्टार्कने सलग दुसऱ्या सामन्यात पटवून दिले. क्वालिफायर १ आणि फायनलमध्ये आपल्या अप्रतिम गोलंदाजीने स्टार्कने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज का मानला जातो. स्टार्कनंतर वैभव अरोराने चमत्कार केला आणि ट्रॅव्हिस हेडला बाद करून हैद्राबादचे कंबरडेच मोडले, हैद्राबादने संपूर्ण मोसमात याच दोन सलामीवीरांच्या जोरावर सामने जिंकले, हैद्राबादला अंतिम फेरीत या सलामीवीरांकडून खूप अपेक्षा होत्या. पण हे होऊ शकले नाही. हेड बाद होताच हैद्राबादवर पराभवाचे सावट पसरू लागले.
केकेआरच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यामुळे केकेआरच्या गोलंदाजांसमोर हैदराबादचे फलंदाज खेळपट्टीवर टिकूच शकले नाहीत. मार्कराम आणि हेनरिक क्लासेनची बॅटदेखील नि:शब्द राहिली. खेळपट्टीने तिचा प्रभाव दाखवला, सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत केली तर नंतर फिरकीपटूंनी त्यांचे काम केले. हैद्राबादच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे त्यांच्यासाठी खूप कठीण असल्याचे दिसत होते. हैद्राबादकडून कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या. शेवटचा फलंदाज म्हणून कमिन्सची विकेट पडली. हैद्राबाद कॅम्पची पूर्ण निराशा झाली, ज्या फलंदाजीच्या जोरावर हैद्राबादने अंतिम फेरीपर्यंत यशस्वी होण्याचा निर्धार केला होता, त्याच फलंदाजीने अंतिम फेरीत त्यांना सामन्यातून बाहेर काढले. केकेआरच्या गोलंदाजांनी जेतेपद पटकावल्याचे चित्र स्पष्ट केले होते. प्रथम खेळताना हैदराबादने १८.३ षटकांत ११३ धावा केल्या.
विजयासाठीच्या ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुनिल नारायण आणि रहमानउल्ला गुरबाज मैदानात आले. ध्येय अगदी सोपे होते. पण हैद्राबादचे गोलंदाजही कुणापेक्षाही कमी नव्हते. पण फायनलमध्ये बोर्डावर धावा नसल्याचा अर्थ हैद्राबादच्या गोलंदाजांना काही करता आले नाही. मात्र, नारायणला लवकर बाद करत हैद्राबादने सामना रंगवण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी शानदार फलंदाजी केली, यानंतर दोघांनीही विकेट पडू दिली नाही. केकेआरची पहिली विकेट केवळ अकरा धावांवर पडली. इथून हैद्राबादला पुनरागमन करता आले असते पण गुरबाज आणि व्यंकटेश यांच्या चाणाक्ष खेळाने केकेआरचा सामना रंगला. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली. अय्यरने केवळ २६ चेंडूंत नाबाद ५२ धावा करताना चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावा करताना पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. संघाच्या १०२ धावा असताना गुरबाज बाद झाला पण तोपर्यंत केकेआर सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता.
गुरबाज बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीस आला. व्यंकटेश अय्यरसह श्रेयसने केकेआरला विजेतेपद पटकवण्यास मदत केली. दहा वर्षांपासून, एक संघ चमकणारी आयपीएल ट्रॉफी पुन्हा उचलण्याची वाट पाहत होता, अखेर एका दशकानंतर केकेआरला विजेतेपद मिळाले, केकेआरच्या खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू कर्णधार आणि व्यंकटेशला गाठण्यासाठी धावले. संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरलाही आपला आनंद लपवता आला नाही. एरव्ही नावाप्रमाणेच असलेल्या गंभीरच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याचवेळी संघ मालक शाहरुख खानही प्रेक्षक गॅलरीत नाचत होता. शाहरुख हात पसरून आपल्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये विजय साजरा करत होता. केकेआरचे चाहते तर अक्षरशः वेडे झाले होते.
COMMENTS