छ. संभाजीनगर ः शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला चक्क 150 कोटींची जमीन हैदराबादमधील सालार जंग कुटुबांतील वंशजाने
)
छ. संभाजीनगर ः शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला चक्क 150 कोटींची जमीन हैदराबादमधील सालार जंग कुटुबांतील वंशजाने भेट दिल्याने खळबळ उडाली आहे. ही भेट नेमक्या कोणत्या कारणांसाठी दिली, भुमरेंच्या चालकांचे नेमके कर्तृत्व काय? त्यांनी हैदराबादमधील सालार जंग कुटुंबांतील वंशजावर कोणते उपकार केले? त्यामुळे त्यांना तब्बल 150 कोटींची जमीन भेट दिली, असे सवाल आता उपस्थित होतांना दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील तीन एकर जमीन भुमरे यांच्या चालकाला भेट देण्यात आली आहे. याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, यावर बोलतांना आमदार विलास भुमरे म्हणाले की, जावेद रसूल माझे गाडीचे चालक आहेत परंतु, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही. हैद्राबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून ’हिबानामा’ (भेटवस्तू) मध्ये संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किंमतीची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सदरील चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. चालक जावेद रसूल शेख असे ड्रायव्हरचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गणेश शाखेने या चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याच्या प्राप्तीकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर भेट कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
सालारजंग कुटुंबाशी माझे चांगले संबंध ः जावेद रसूल
जावेद रसूल यांनी आपली बाजू स्पष्ट करतांना म्हटले आहे की, माझे सालारजंग कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मला ही जमीन बक्षीसपत्र म्हणून दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या प्रकरणी चालक जावेदला समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले.

COMMENTS