चांदवड: येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात दुबई येथील १२ वर्षीय जैनम जैन आण
चांदवड: येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात दुबई येथील १२ वर्षीय जैनम जैन आणि १० वर्षीय जिविका जैन यांनी ‘नेटवर्किंगची शक्ती’ आणि ‘वयाच्या ९व्या वर्षी मी माझा व्यवसाय कसा सुरू केला ?’ या विषयांवर उपस्थितांसमोर प्रेरणादायी भाषण केले. या कार्यक्रमाला सुमारे १५० श्रोते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात जैनम आणि जिविका यांनी त्यांच्या युट्युब चॅनेल ‘जेजे फनटाईम’च्या यशस्वी प्रवासाची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, “आम्ही वाचन केले, भरपूर मेहनत घेतली आणि ‘जेजे फनटाईम’ नावाचा युट्युब चॅनेल सुरू केला. यात आम्हाला आमच्या पालकांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांच्या या यशस्वी प्रवासात नेटवर्किंगचे महत्त्व कसे आहे हे त्यांनी उपस्थितांना समजावले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी हे उपस्थित होते. याप्रसंगी जैनम आणि जिविकाचा सत्कार करण्यात आला. डॉ. एम. आर. संघवी यांनी त्यांच्या भाषणात जैनम आणि जिविकाचे कौतुक करत आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “जैनम आणि जिविका हे बाल उद्योजक उद्याचे स्टार आहेत. त्यांनी लहान वयातच व्यवसायामध्ये जे यश मिळवले आहे, ते सर्वांनी शिकण्यासारखे आहे.” आज जैनम व जिविका सर्वांना ह्या वयात मार्गदर्शन करत आहेत . नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढीने प्रेरणा घेऊन व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकावे असे मत व्यक्त केले. .
जैनम आणि जिविका यांनी ‘नेटवर्किंगची शक्ती’ या विषयावर बोलताना सांगितले की, “नेटवर्किंगमुळे आपल्याला नवीन संधी मिळतात आणि आपली ओळख तयार होते. नेटवर्किंगमुळेच आम्हाला आमच्या युट्युब चॅनेलसाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि संधी मिळाल्या. त्यांनी उपस्थितांना नेटवर्किंगचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांनी त्यांच्या यशस्वी उद्योजकीय प्रवासाच्या गोष्टीबाबत संवाद साधला.
‘वयाच्या ९व्या वर्षी मी माझा व्यवसाय कसा सुरू केला?’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही वाचन केले, विविध उद्योजकांची उदाहरणे पाहिली आणि आम्हाला व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. आमच्या पालकांच्या समर्थनामुळे आणि मेहनतीमुळे आम्ही ‘जेजे फनटाईम’ युट्युब चॅनेल सुरू केला. या चॅनेलमुळे आम्हाला विविध ठिकाणी ओळख मिळाली आणि आम्ही अनेक मुलांना आणि मोठ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करून दिली.”
जैनम आणि जिविकाच्या या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांच्या मनात नवीन उर्मी निर्माण झाली. त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे उपस्थितांना आपल्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि नवीन संधी शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात सकारात्मक विचारांचा विकास घडवला आणि त्यांना नवीन दिशा दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पी. एम. बोरा यांनी केले.
कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, योगेश मोदी , अभिजित मोदी आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य तसेच प्राचार्य डॉ. आर. जी. तातेड आदींनी शुभेच्छा दिल्या.
COMMENTS