अहमदनगर/प्रतिनिधी ः पोलिस खाते जात-धर्म बाजूला ठेवून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अखंड कार्यरत असते, असे आवर्जून सांगितले जाते. पण नगरच्या अहमदनग

अहमदनगर/प्रतिनिधी ः पोलिस खाते जात-धर्म बाजूला ठेवून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अखंड कार्यरत असते, असे आवर्जून सांगितले जाते. पण नगरच्या अहमदनगर जिल्हा पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी निवडणुकीत चक्क जय श्रीराम पॅनेल रिंगणात उतरले आहे व त्यांना प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनेल आहे. येत्या रविवारी (9 एप्रिल) या सोसायटीच्या 15 जागांसाठी निवडणूक होत असून, यात दोन पॅनेलचे प्रत्येकी 15 मिळून 30 व स्वतंत्र 3 असे 33 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, प्रभू श्रीराम व राम-लक्ष्मण यांना खांद्यावर घेतलेला हनुमान अशा धार्मिक चित्रांसह असलेले जय श्रीराम पॅनेलचे प्रचार पत्रक पोलिस दलात मात्र चर्चेचे झाले आहे.
अहमदनगर जिल्हा पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सध्या जिल्हा पोलिस दलात सुरू आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या 15 जागांपैकी 10 सर्वसाधारण, दोन महिला राखीव आणि अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती-जमाती-विशेष मागासवर्ग या अन्य तीन राखीव जागा आहेत. सोसायटीचे 2 हजार 873 मतदार आहेत. जिल्हा सहकार उपनिबंधक कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किरण आव्हाड निवडणूक निर्णय अधिकारी असून, येत्या रविवारी (9 एप्रिल) सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत लालटाकीजवळील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत मतदान होणार आहे व त्यानंतर लगेच मतमोजणीही होणार आहे. या निवडणुकीत उतरलेल्या जय श्रीराम पॅनेलला नारळ व परिवर्तन पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले आहे तर तीन स्वतंत्र उमेदवारांना कपबशी, पतंग व खुर्ची अशी चिन्हे आहेत.
असे आहेत उमेदवार
जय श्रीराम पॅनेल संजय मांगीलाल चोरडिया पुरस्कृत असून, त्यांच्याकडून गणपत कर्डिले, अमोल कांबळे, लक्ष्मण खोकले, कविता गडाख, सागर बनसोडे, गणेश मिसाळ, नितीन मोरे, दीपक रोहोकले, पल्लवी रोहोकले, अविनाश वाकचौरे तसेच संदीप भोसले आणि मोहिनी कर्डक व नंदिनी झिने तसेच राजू सुद्रिक व सचिन अंधारे हे उमेदवार आहेत तर अहमदनगर पोलिस सभासद पुरस्कृत परिवर्तन पॅनेलमध्ये अभिजीत अरकल, सविता खताळ (छोटी ताई), भीमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, दीपक घाटकर, संदीप घोडके (गोट्या), संदीप जाधव, वैभव झिने, रेवणनाथ दहीफळे व जावेद शेख तसेच सचिन शिरसाठ आणि मनीषा काळे व प्रज्ञा प्रभुणे तसेच बाळासाहेब भोपळे व राहुल द्वारके उमेदवार आहेत. तर स्वतंत्रपणे गणेश आरणे, संजय गायकवाड व आण्णा भडकवाड हे स्वतंत्र नशिब आजमावत आहेत. दरम्यान, जय श्रीराम पॅनेलने महिला दोन राखीव जागांव्यतिरिक्त सर्वसाधारण जागांतून आणखी दोन अशा एकूण 4 महिला उमेदवार दिल्या आहेत तर परिवर्तन पॅनेलने राखीव दोनसह सर्वसाधारणमध्येही एक अशा एकूण 3 महिला उमेदवार दिल्या आहेत. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
COMMENTS