Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यातूनच शेतकरी आणि दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य मिळाले  

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन ः कोपरगामध्ये रोहमारे पुरस्कारांचे वितरण

कोपरगाव प्रतिनिधी - समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय. साहित्य हे समाजाची धारणा, दशा आणि समाजाला उन्नत करणारे मौल

आणखी 30 पिशव्यांतून निघाले बेन्टेक्सचे दागिने ; नगर अर्बन बँकेचे बनावट सोनेतारण गाजणार
साखर उद्योगात फुले 265 वाणाचे समज आणि गैरसमज
नगरच्या किल्ल्यात देशविरोधात घोषणा देणारा अटकेत

कोपरगाव प्रतिनिधी – समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय. साहित्य हे समाजाची धारणा, दशा आणि समाजाला उन्नत करणारे मौल्यवान साधन होय.  ज्या देशात दारिद्र्य, बेरोजगारी, बकालपणा, शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे  सुरक्षेचे प्रश्‍न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेर्‍यात  समाज अडकलेला राहतो. असा समाज कधीही प्रगती करू शकत नाही. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याबरोबरच दलित साहित्य देखील उदयास आले. या साहित्य प्रवाहांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि दीन – दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य दिले अशा साहित्याचा आणि त्यातील मूल्यांचा मी प्रबळ समर्थक आहे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,  राज्यसभेचे माजी सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.


स्थानिक के. जे.सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. प्रोफेसर मुणगेकर पुढे म्हणाले की मी जन्मापासून स्त्रीवादी आहे. आज येथे ज्यांना ग्रामीण साहित्य पुरस्कार दिले गेले, त्यांच्या साहित्यातून स्त्रियांच्या वेदना, त्यांची दमकोंडी आणि त्यांचे प्रश्‍न अतिशय यथार्थपणे मांडले गेलेले आहेत. त्यामुळे हे सर्व साहित्यिक खर्‍या अर्थाने सन्मानाचे पात्र आहेत. कै. के. बी.  रोहमारे, त्यांचा भि. ग. रोहमारे ट्रस्ट व त्यांचे के. जे. सोमैया महाविद्यालय हे आदर्श काम करणार्‍या संस्था आहेत. त्यांच्या आदर्शाचे वर्णन या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पुढे आणावे. राजकारण एक अत्यंत आदर्श कला आहे.  संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष अनिवार्य आहे. कारण त्यांच्या शिवाय लोकशाही चालणार नाही.


यावेेळी बोलतांना अशोकराव रोहमारे म्हणाले की, आज मुणगेकर  साहेबांचे प्रेरक भाषण ऐकून असे वाटले की गेली 33 वर्ष त्यांच्या भाषणाची आम्हाला प्रतीक्षा होती.  असे मौल्यवान विचारधन त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर आमच्या पुरस्कार योजनेचे खर्‍या अर्थाने सोने झाले.  यापूर्वी आर्थिक संकटांच्या काळात पुरस्काराबद्दल अनेकदा पुरस्कार पुढे चालू ठेवावा की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होत होता.  परंतु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आग्रहामुळे आमचे मनोबल वाढले व हा उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवला असल्याचेही अशोकराव रोहमारे यांनी येथे सांगितले. पुरस्कार प्राप्त कवी लक्ष्मण महाडिक, कादंबरीकार उत्तम बावस्कर, कवी डॉ. सुभाष वाघमारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यंदा उत्तम बावस्कर यांना काळबाटा या उत्कृष्ट ग्रामीण कादंबरीसाठी, ज्योती सोनवणे यांना दमकोंडी या उत्कृष्ट ग्रामीण कथासंग्रहासाठी, लक्ष्मण महाडिक यांना स्त्री-पुरुषाच्या कविता व डॉ.सुभाष वाघमारे यांना संविधानाच्या स्वप्नातलं गाव या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी  विभागून तर जी. ए.  उगले व डॉ.  रामकिशन दहिफळे यांना उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्काराचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रुपये 15000- रोख, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होतेया कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ. गणेश देशमुख,  रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, सहकार्यवाह डॉ. संजय दवंगे, प्रो. डॉ. के. एल. गिरमकर, प्रो. डॉ. एस.एल. अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले.  

COMMENTS