शिर्डी ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी
शिर्डी ः शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या ‘कलम 127 अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रिका, भित्तीपत्रके, होल्डींग्स, फ्लेक्स बोर्ड तो स्वतःच त्याचा प्रकाशक आहे. याबद्दल स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तिशः ओळखतात अशा दोन व्यक्तीनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दयावेत. दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रक व प्रकाशकाने त्या दस्ताएवजाची एका प्रतीसह प्रकाशकाच्या अधिकथनाची एक प्रत राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी मुद्रित झाला असेल तर, मुख्य निर्वाचन अधिकार्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मुद्रीत झाली असेल तर त्या जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकार्याला पाठविल्याशिवाय मुद्रीत करता येणार नाही किंवा मुद्रीत करवता येणार नाही. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 127-मधील तरतूदीं भंग केल्यास मुद्रक किंवा प्रकाशकास सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयापर्यत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास, किंवा व दोन्ही शिक्षा होऊ शकते. कोणतीही व्यक्ती मुद्रक किंवा प्रकाशक यांना धर्म, पंथ, जात, समाज किंवा भाषा यामध्ये तेढ निर्माण करणारे अथवा विरोधकाचे चारित्र्यहरण करणारे निवडणूक विषयक मजकूर व साहित्य प्रकाशित करता येणार नाही. भारत निवडणूक आयोग यांचेकडील सूचना तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 127 – मधील तरतूदीनुसार मुद्रक व प्रकाशक यांना जोडपत्र क व जोडपत्र ख मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने छपाई साहित्याची माहिती देणे बंधनकारक आहे.असे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कोळेकर यांनी कळविले आहे.
COMMENTS