देवळाली प्रवरा :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव पदावरून नाट्यमय घडामोडी पहावयास मिळत आहे. एकाच खुर्चीवर दोन कुलसचिव अशी परिस्थित
देवळाली प्रवरा :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव पदावरून नाट्यमय घडामोडी पहावयास मिळत आहे. एकाच खुर्चीवर दोन कुलसचिव अशी परिस्थिती निर्माण होऊन कुलसचिव अरुण आनंदकर की सहयोगी प्राध्यापक मुकूंद शिंदे याबाबत विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्यामध्ये एकच गोंधळ उडाला आहे. 8 ऑक्टोंबर रोजी शासनाचे कृषी विभागाचे उपसचिव कार्यालयाच्या आदेशानुसार कुलगुरू पाटील यांनी तडकाफडकी निर्णय घेत कुलसचिव आनंदकर यांना रात्रीच कार्यमुक्त करण्याचा आदेश जारी केला होता. कुलसचिव अरुण आनंदकर यांच्या जागी सहयोगी प्राध्यापक मुकुंद गंगाधर शिंदे यांची नियुक्ती केली होती.
विद्यापीठात अधिकार्यांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार 8 ऑक्टोंबरच्या रात्रीच कुलगुरू यांचे स्विय सहाय्यक गायकवाड यांनी कुलसचिव कार्यालय सील करून घेतल्याची माहिती मिळाली. कुलसचिव आनंदकर यांच्याकडून कारभार हस्तांतरण प्रक्रिया न होता दुसर्याच दिवशी कुलगुरू यांच्या आदेशानुसार प्रभारी कुलसचिव शिंदे यांनी कुलसचिव कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर कुलसचिव आनंदकर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणकडे धाव घेत कुलगुरू पाटील यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले. मॅटमध्ये कुलसचिव पदाच्या निर्णयाबाबत दोन्ही बाजुची भूमिका जाणून घेतल्यानंतर 11 ऑक्टोंबर रोजी आपला आदेश सुनावला. न्यायाधिश व्ही.के. जाधव यांनी आदेश देत विद्यापीठातील परिस्थितीवर जैसे थे चा आदेश देत कुलसचिव आनंदकर यांनाच कामकाज पाहण्याचा आदेश दिल्याचा दावा कुलसचिव आनंदकर यांनी केला आहे. न्यायालयाची आदेश प्रत व आपले पत्र जोडत त्यांनी काल दि. 14 रोजी सकाळीच कुलसचिव कार्यालय गाठले. परंतू संबंधित कार्यालयावर कुलगुरू यांनी नियुक्त केलेले प्रभारी कुलसचिव मुकुंद शिंदे यांनी न्यायालय किंवा शासनाकडून कोणताही आदेश नसल्याने कार्यालयाचा ताबा सोडण्यास नकार दिला. दुपारपर्यंत दोन्ही अधिकारी कुलसचिव म्हणून कार्यालयात बसून होते. दुपारच्या सत्रात कुलसचिव शिंदे यांनी कार्यालयाला कुलूप लावून घेतले. कुलूप लावून घेतल्याचे पाहून दुपारीच कुलसचिव आनंदकर हे घरी गेल्याची माहिती मिळाली. दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव पदावरून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कुलसचिव आनंदकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाच्या कार्यमुक्तीचा आदेश आल्यानंतर कार्यालयिन वेळ संपल्यानंतर कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांनी कार्यमुक्तीचा आदेश काढला. त्यानंतर तत्काळ कुलगुरू यांचे स्विय सहाय्यक यांनी कुलसचिव कार्यालय सील केले. शासनाच्या अध्यादेशानुसार पद हस्तांतरण प्रक्रिया झालीच नाही. कुलगुरू यांच्या आदेशानुसार कुलसचिव कार्यालय सील करून घेण्यात आल्याने मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने पद हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगत माझी नियुक्ती 3 वर्षासाठी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कुलसचिव म्हणून मलाच काम करण्याचा आदेश देत जैथे थे चा आदेश पारित झाल्याची माहिती कुलसचिव आनंदकर यांनी दिली.
21 प्राध्यापकांच्या पदोन्नतीची चर्चा?
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 21 प्राध्यापकांना पदोन्नती देण्याच्या विषयावरूनच विद्यापीठातील अधिकारी व कुलसचिव यांच्यामध्ये मतभेट वाढल्याची चर्चा आहे. मतभेद झाल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून हालचाल होऊन 8 ऑक्टोंबर रोजी कृषी विभागाचे उपसचिव यांनी कार्यमुक्त आदेश देताच रात्री उशिरा कुलगुरू डॉ. पाटील यांनी कुलगुरू आनंदकर यांना कार्यमुक्त केले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या त्या 21 प्राध्यापकांच्या पदोन्नतीवरूनच रणकंदन पेटल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.?
हस्तांतरण प्रक्रिया न करताच प्रभारी कुलसचिव शिंदे यांचे कामकाज सुरू
शासनाच्या अध्यादेशानुसार कोणत्याही पदाबाबत हस्तांतरण पक्रिया झाल्याशिवाय बदली किंवा कार्यमुक्त प्रक्रिया पूर्ण होत नाही. दरम्यान, कुलसचिव आनंदकर यांच्याकडून पद हस्तांतरण न करताच कुलगुरू नियुक्त कुलसचिव शिंदे यांनी कामकाज सुरू केल्याचे बोलले जात आहे. कुलसचिव आनंदकर यांनीही हस्तांतरण पत्रावर सही केलीच नसल्याने कार्यमुक्त प्रक्रिया झालीच नसल्याचा दावा सांगितला आहे.
COMMENTS