Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात यंदा एल निनोमुळे अपुरा पाऊस

केवळ 94 टक्के पावसाचा स्कायमेटचा अंदाज

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः एल निनोच्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असून, यंदा सरासरीपेक्षा मान्सून कमी पडणार असल्याचा अंदाज स्क

वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात
देशातील रामसर स्थळांच्या संख्येत 5 नवीन स्थानाचा समावेश
बैलगाडी शर्यतीला कोर्टाची मान्यता : आ. सदाभाऊ खोत यांची बैलगाडीतून मिरवणूक

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः एल निनोच्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असून, यंदा सरासरीपेक्षा मान्सून कमी पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. तसेच जून-सप्टेंबर या काळात मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल, याचे प्रमाण 94 टक्के असणार आहे. यामुळे देशातील अन्नधान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह म्हणाले की, ट्रिपल-डिप-ला निनामुळे गेल्या सलग चार वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा राहिले. आता ला निना संपला आहे आणि एल निनोची शक्यता वाढत असून पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल. संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो.
मराठी विज्ञान परिषदेच्या अदिती जोगळेकर यांच्या मते, 16 व्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्यांनी ‘एल निनो’ असे नाव दिले. सामान्यत: पश्‍चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनार्‍यालगत हवेचा दाब कमी असतो. याविरुद्ध पूर्व-प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावर हवेचा उच्च दाब असतो. हवेच्या दाबातील फरकाने वारे आणि त्यासोबत बाष्प पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहते त्यामुळे आग्नेय आशियासह भारतीय उपखंडात पाऊस पडतो. एका वर्षीच्या उन्हाळयामध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील 12-18 महिने टिकू शकते. त्याची तीव्रता तापमानावर ठरते. 4 ते 5 अंश फॅरेनहाईट तापमानवाढ झाल्यास सौम्य, पण 14 ते 18 अंश फॅरेनहाईटने तापमानवाढ झाल्यास सर्वदूर परिणाम दिसतात. दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम घडतो. पूर्वप्रशांत महासागरातील पेरू, इक्वाडोरच्या किनार्‍यालगत नेहमीपेक्षा प्रबळ उष्ण प्रवाह तयार झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या उलट पश्‍चिमेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागरावर उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागराकडून बाष्पभारित वारे पूर्वेकडे वाहतात. याचा परिणाम म्हणून दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर आग्नेय आशियामध्ये अवर्षणाची स्थिती निर्माण होते. एल निनो सक्रिय झाल्यास व्यापारी वारे कमजोर होतात. सागरी प्रवाह व समुद्रपातळीत बदल घडतात. एल निनो प्रबळ असलेल्या वर्षी अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे कमी होतात. परंतु भारतीय उपखंडातील बर्‍याच देशांमध्ये दुष्काळ पडतो. भारतात गेल्या 50 वर्षांत पडलेले 13 पैकी 10 दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत.

महाराष्ट्रातही यंदा कमी पावसाचा अंदाज – स्कायमेटच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस 858.6 मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

COMMENTS