नवी दिल्ली ः कामगारांना, विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्यांमध्ये सुधारणा कर
नवी दिल्ली ः कामगारांना, विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्यांमध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कामगारांना राहणीमानाच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने ही वाढ करण्यात आली आहे.
इमारत बांधकाम, माल चढवणे आणि उतरवणे, चौकीदार किंवा पहारेकरी, केर काढणे, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि कृषीसह विविध क्षेत्रांमध्ये कामगारांना सुधारित वेतन दरांचा लाभ मिळेल. नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. वेतनदरांमध्ये शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. किमान वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केले जाते -अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल-तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार-ए, बी आणि सी श्रेणी आहे. वेतन सुधारणेनंतर अकुशल कामासाठी उदा. बांधकाम, झाडूकाम, साफसफाई, माल चढवणे आणि उतरवणे या क्षेत्रातील कामगारांसाठी ए श्रेणीत किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (मासिक 20,358 रुपये) अर्ध-कुशल 868 रुपये प्रतिदिन (मासिक 22,568 रुपये) असतील. याशिवाय कुशल, कारकुनी आणि विना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरीसाठी दिवसाला 954 रुपये (24,804 रुपये प्रति महिना) आणि अत्यंत कुशल आणि शस्त्रास्त्रे बाळगणार्या चौकीदार किंवा पहारेकर्यासाठी 1,035 रुपये प्रतिदिन (26,910 रुपये) वेतन दर आहे. औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे परिवर्तनीय महागाई भत्तामध्ये सुधारणा करते.
COMMENTS