शिर्डी/प्रतिनिधी ः महाराष्ट्राला समृध्द करणार्या हिंदूहृदय सम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीचा दुसरा
शिर्डी/प्रतिनिधी ः महाराष्ट्राला समृध्द करणार्या हिंदूहृदय सम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीचा दुसरा टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज शुक्रवार 26 मे रोजी कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथून होत आहे. यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 10 जिल्ह्याशी थेट व 14 जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाणार आहे. समृध्दी महामार्गावरील सर्वात मोठा सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. एका अर्थाने विकासाच्या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या दुसर्या टप्प्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र. 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसर्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये असून लांबी 80 किमी आहे. या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 701 किमी पैकी आता एकूण 600 किमी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे. या दुसर्या टप्यात सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल. भरवीर इंटरचेजपासून घोटी (ता. इगतपुरी) हे अंदाजे 17 किमी अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणार्या भाविकांचा प्रवास जलद होईल. तसेच भरवीर या इंटरचेजपासून एसएमबीटी रुग्णालय अत्यंत जवळ (500 मीटर अंतरावर) आहे. शिर्डीपासून या रुग्णालयापर्यंत एक तासाच्या आत पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकर्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल.
COMMENTS