खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत रंगला शह-काटशह…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत रंगला शह-काटशह…

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बुद्धीबळाच्या पटावर कस लावण्याची संधी मिळाली नसलेल्या खेळाडूंनी शुक्रवारी बुद्धीबळाच्या पटावर शह

कर्जाचा विनीयोग योग्य कामासाठी करा ः कोल्हे
संगमनेरमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात
Ahmednagar : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साहसी रॅपलिंग l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बुद्धीबळाच्या पटावर कस लावण्याची संधी मिळाली नसलेल्या खेळाडूंनी शुक्रवारी बुद्धीबळाच्या पटावर शह-काटशह खेळ रंगवला. राज्यभरातील सव्वादोनशेवर खेळाडूंचा सहभाग असलेली खुली बुद्धीबळ स्पर्धा येथे सुरू झाली असून, खेळाडूंचा उत्साही सहभाग पहिल्याच दिवशी दिसला. तीन दिवस ही स्पर्धा येथे सुरू राहणार आहे.
येथील शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या पुढाकाराने नगरमध्ये खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला बडी साजन मंगल कार्यालयात सुरुवात झाली. तीन दिवस ही आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा सुरू राहणार आहे. सोहम ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित बुरा व बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव निरंजन गोडबोले यांनी बुद्धिबळ पटावर एकमेकांना चाल देऊन स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी जळगाव येथील ऑर्बिटर प्रवीण ठाकरे, ठाणे येथील ऑर्बिटर अजिंक्य पिंगळे, औरंगाबाद प्रीती समदानी, बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्‍वस्त पारूनाथ ढोकळे, कार्तिक आदींसह पालक व खेळाडू उपस्थित होते. यावेळी बोलताना बुरा म्हणाले की, क्रीडा क्षेत्राला उभारी व नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचा पुढाकार राहणार आहे. बुद्धिबळ ही मनाची व्यायाम शाळा आहे. नियमित व्यायाम केल्याने जसे शरीर बलशाली बनते, त्याप्रमाणे नियमित बुद्धिबळाचा सराव केल्याने मनालाही निरोगी ठेवू शकतो, असे ते म्हणाले. बुद्धिबळ संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव गोडबोले म्हणाले की, खेळाडूंनी या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावून आपले प्राविण्य दाखवावे. तसेच भविष्यात आपल्या विविध जिल्ह्यांत स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंसाठी फार मोठी संधी निर्माण केल्या जाणार असून, खेळाडूंनी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सचिव यशवंत बापट यांनी नगरमधील खेळाडूंसाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे खेळाडूंच्या खेळाचा स्तर उंचावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वागत संघटनेचे विश्‍वस्त ढोकळे यांनी केले. प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव बापट यांनी या खुली बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्रातील 232 खेळाडूंनी सहभाग घेतला असून, ही आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा असल्याचे सांगितले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराधा बापट, डॉ.स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, देवेंद्र ढोकले, मनीष जसवाणी, प्रकाश गुजराती, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी आदी परिश्रम घेत आहे. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

COMMENTS