Homeताज्या बातम्यासंपादकीय

विधानसभेत ‘तारीख पे तारीख’ तर ऍड. आंबेडकरांचा काॅंग्रेसला इशारा !

महाराष्ट्रात तीन महत्त्वपूर्ण घटना या राजकीय पटलावर घडलेल्या आहेत. त्यातील दोन घटना या राजकीय पक्षांकडून तर, एक घटना ही विधिमंडळात घडलेली आहे. त्

संविधानाचा सांस्कृतिक संघर्ष !
महाराष्ट्राचे पहिले गैर काॅंग्रेसी मुख्यमंत्री !
सुखवस्तू जीवनशैलीचा कर्मचारी वर्ग !

महाराष्ट्रात तीन महत्त्वपूर्ण घटना या राजकीय पटलावर घडलेल्या आहेत. त्यातील दोन घटना या राजकीय पक्षांकडून तर, एक घटना ही विधिमंडळात घडलेली आहे. त्यातील पहिली घटना म्हणजे ज्या १६ आमदारांच्या पात्रतेविषयीचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यावर विधानसभेचे अध्यक्ष ऍड. नार्वेकर हे निर्णय देणार होते; परंतु, प्रत्यक्षात त्यांनी ‘तारीख पे तारीख, हीच बाब पुन्हा सिद्ध केली. महाराष्ट्राच्या सत्ता पटलावर १६ आमदारांच्या पात्रतेसंदर्भात चा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र विधानसभेकडे आल्यामुळे आणि त्यावर आता न्यायालयाने वेळेची मर्यादा घालून वेळापत्रक तयार करण्याचे बंधनकारक केल्याने, येत्या काही दिवसांमध्ये कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षांना यावर निर्णय घ्यायचाच आहे; ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच विधीज्ञांच्या मते  १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष, परंतु हंगामी अध्यक्षाची जबाबदारी सांभाळणारे नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती. त्या नोटीसीवरच हा सगळा खटला अवलंबून आहे. त्यामुळे निर्णय काय घ्यायचा आहे, या संदर्भात एक सीमारेषा स्पष्ट झाली आहे. आगामी काळात सरकारच्या अस्थिरतेविषयी जरी प्रश्न निर्माण होत असला तरी, आज तीन पक्षांच्या आघाडीमुळे १६ आमदार अपात्र ठरले तरी सरकार ताबडतोब जाण्याच्या स्थितीत नाही, हे मात्र नक्की. तर, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या बूथ पदाधिकाऱ्यांचे आयोजित केलेल्या बैठकीत, पत्रकारांच्या संदर्भात केलेले वक्तव्य, हे प्रसार माध्यमांमध्ये थेट प्रसारित झाल्यामुळे त्यावर मोठा गदारोळ झाला. अर्थात, यावर भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सारखीच सारवासारव केली. तर तिसरी आणि मोठी घटना म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला एक प्रकारे अल्टीमेटम दिला आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी काँग्रेसला थेट इशारा देत आमच्याशी चर्चा करा अन्यथा आम्ही आमच्या जागा घोषित करू!  सध्याचा काळ राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कोणताही पक्ष उमेदवारी घोषित करण्याच्या प्रक्रियेत अद्याप तरी दिसत नाही. अशावेळी, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ४८ जागांवर आपण स्वतंत्र लढू; जर काँग्रेसने एक आठवड्याच्या चर्चा केली नाही, अशी भूमिका घेतली आहे. यापूर्वी इंडिया आघाडीमध्ये त्यांना निमंत्रण दिले गेले नव्हते. परंतु, काँग्रेसने निमंत्रण दिल्याचा एकप्रकारे खोडसाळ प्रचार केला होता, असा आरोप ऍड. आंबेडकर यांनी केला.  परंतु, ऍड. प्रकाश आंबेडकरांनी ती बाब खोटी असल्याचे सांगून अशा प्रकारचा अपप्रचार थांबविण्याचे आव्हान केले. अर्थात २००४ च्या निवडणुका या २०२४ च्या एप्रिल किंवा मे महिन्यातच लागतील, असं सध्या गृहीत धरायला ऍड. प्रकाश आंबेडकर तयार नाहीत. कारण त्यांना असे वाटते की या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंतच कदाचित निवडणुका घेण्याची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आपण तत्पर राहणार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, एका बाजूला संघ भाजपवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सोबतही आघाडी किंवा युती होत नाहीये, तसा प्रयत्न दोन्ही बाजूंच्या पक्षांकडूनही होताना दिसत नाही, त्यामुळे या पक्षांच्या डोक्यात नेमकं आहे तरी काय, हा संभ्रम सामान्य मतदाराच्या दृष्टीने निश्चितपणे पडलेला आहे. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीत जर वंचित बहुजन आघाडीने सर्वच जागांवर उमेदवार घोषित केले तर त्याचा परिणाम निश्चितपणे महाविकास आघाडीवर होणार आहे. यामध्ये शिवसेना ज्या जागांवर लढेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार नाही, अशी शक्यता स्पष्टपणे दिसते. कारण महाविकास आघाडीतील पक्षांची जागावाटप झाल्यानंतर शिवसेनेच्या वाटेला ज्या जागा येतील त्या जागा सोडूनच आम्ही उमेदवारी जाहीर करू, अशी भूमिकाच अप्रत्यक्षपणे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण हे नेमकी कशी गती घेणार, हे फार महत्त्वाचे झाले आहे.  वंचित बहुजन आघाडीने बोलणी करण्याचा प्रस्ताव राज्यातील नेत्यांना न देता, थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टिकोनातून ही बाब कशी पाहिली जाईल, हा आणखी वेगळा भाग आहे.  ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणतात की, महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना जागा वाटपाचा अधिकार नसतो; त्यामुळे त्यांच्याशी बोलणी करण्यात अर्थ नसतो! हीच त्यांची भूमिका काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बोलणी करण्यासंदर्भात पत्र लिहिण्याच्या प्रक्रियेतून दिसते.

COMMENTS