अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात बुधवारी पहाटेच्यावेळी मशिदींच्या अजानच्यावेळेस भोंगे शांत होते. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सह
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात बुधवारी पहाटेच्यावेळी मशिदींच्या अजानच्यावेळेस भोंगे शांत होते. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा मान ठेवून बुधवारी पहाटे भोंग्यांचा वापर न करता अजान देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शहरात बंदोबस्तही वाढविला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशार्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र, रात्रीच पोलिसांनी मशिदीच्या मौलानांची बैठक घेतली. त्यामध्ये सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे ठरले. त्यामुळे नगरमध्ये बुधवारी पहाटेची अजान भोंग्यांविनाच झाली. पहाटे साडेपाच वाजता ही अजान असते. सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई आहे. त्यामुळे या काळात भोंग्यांचा वापर न करता अजान देण्यात आली. आता पुढची अजान दुपारी भोंग्यावरून होणार. त्यानंतर सायंकाळी आणि रात्रीही नेहमीच्या वेळांप्रमाणे अजान होणार आहे. मात्र, त्यासाठी घालून देण्यात आलेली आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी आंदोलनाच्या तयारी असलेल्या मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना नोटीसा दिल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे दीडशे जणांना नोटीसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी शहरात बंदोबस्तही वाढविला आहे.
जिल्ह्यातही भोंगा वाजला नाही…
राज्यात सध्या भोंग्यावरून वातावरण तापलेले असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र सलोख्याचा भोंगा वाजला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुस्लिम बांधवांनी बुधवारी सकाळी एकाही मशिदीवर लाऊड स्पीकरवर अजान म्हटली नाही. तसेच देशातील लाखो लोकांचे श्रद्धा स्थान असलेले शनीशिंगणापूर येथील शनी मंदिरात रोज होत असलेली महाआरती लाऊड स्पीकरविना झाली असून अहमदनगर जिल्ह्याने एक वेगळा आदर्श महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे. नगर जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून मशिदमधील इमाम अथवा विश्वस्त यांची बैठक घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबत माहिती देण्यात आली होती तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले होते. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील एकही मशिदीवरून लाऊड स्पीकरवरून अजान झाली नसल्याने एक वेगळा आदर्श नगर जिल्ह्याने सर्वांसमोर घालून दिला आहे.
महाआरतीची परवानगी नाकारली
नगर शहर व जिल्हा मनसेच्यावतीने नगर शहरातील माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात श्रीहनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी मिळावी म्हणून जिल्हा संघटक सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता दिघे, मनोज राऊत, संतोष साळवे यांनी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांची भेट घेऊन परवानगी मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मनसेच्यावतीने गनिमी कावा वापरून ठिकठिकाणच्या मंदिरात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सचिन डफळ व नितीन भुतारे यांनी सांगितले. दरम्यान, कायदेशीर परवानगी असलेल्या मंदिर-मशिदमधील भोंग्यांबाबत परवानगी मिळण्यासाठी सध्या पोलिस अर्ज मागवत आहेत.
COMMENTS