ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. मंत्री श्री.पाटील यांनी पडघा, वाशिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी येथे भेट दिली.
या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदयांसमवेत आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रमोद काळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तन्मय कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील म्हणाले की, नुकतीच मंत्रालयात ठाणे आणि शहापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा संबंधित काही योजना आहेत, त्या योजनांची पाहणी करणे, अपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कार्यवाही आणि अंमलबजावणी गतिमान करणे, त्यासोबतच बंद असलेली कामे बंद का आहेत, त्यासंबंधी अडचणी काय आहेत, त्या जाणून घेण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. या दौऱ्यात स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधीही सोबत असणार आहेत. आपल्या देशाचा “हर घर जल…हर घर नल” हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो पूर्णत्वास येण्याकरिता हा दौरा आहे. त्यानुषंगाने या दौऱ्यात माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ठाणे जिल्ह्यातील धरणांबाबत सांगताना श्री.पाटील पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकरिता पाठपुरावा करीत आहेत. धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1 हजार 47 कामे सुरु आहेत. त्यापैकी 720 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण असून 327 कामे, घरगुती नळजोडणीची आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील 7 कामे अद्याप सुरू झाली नाहीत. याबाबत वनविभागाचे वाईल्डलाईफची परवानगीची 4 कामे प्रलंबित आहेत. तर 2 कामे जागेच्या अंतर्गत वादामुळे प्रलंबित तर एक ठिकाणी रस्ता नसल्याने तेथे जाण्याची सुविधा नसल्याने प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गत सुरु करण्यात आलेली परंतू सध्या बंद असलेली 51 कामे आहेत. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.
COMMENTS