Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे

अहिल्यानगर दि.२२- समाजातील प्रत्येक गोरगरीबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्ये

नक्टीच्या लग्नाला सतरा इग्न. राष्ट्रीय महामार्गाचे काम काही होईना
पत्नीचा खून करणार पती स्वतःहून पोलिसात झाला हजर..?
नंदुरबारला साकारणार आदिवासी क्रीडा प्रबोधिनी

अहिल्यानगर दि.२२- समाजातील प्रत्येक गोरगरीबाला हक्काचे व परवडणारे घर देण्याचे काम प्रधानमंत्री आवास योजनेतून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवून हक्काचे घर मिळविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना मिशन मोडवर राबविण्याची सूचना राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. शहरातील सहकार सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हफ्ता वितरणाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, विनायक देशमुख, बाबासाहेब टायरवाले, अभय आगरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून गोरगरिबांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास योजना योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या टप्पा २ मध्ये देशभरात ३ कोटी घरे बांधण्यात येणार असून यापैकी २० लाख घरे आपल्या राज्यात बांधण्यास मंजुरी मिळणे ही बाब आपल्या सर्वांसाठी आनंददायी आहे. योजनेतून जिल्ह्यात ८२ हजार कुटुंबांची स्वप्नपूर्ती होत असल्याने याचा मनस्वी आनंद असल्याचे ते म्हणाले.

 राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यात गावठाणाचा विस्तार करत ४ हजार घरकुलांसाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून दिली आहे. गायरान जमिनीवरील घरकुले हटवली जाऊ नयेत यासाठी गतकाळात निर्णय केला आहे. प्रत्येक गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावठाण विस्तारीत प्रस्ताव मंजूर करून घेण्याबरोबरच गायरानातील घरकुले नियमित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष मोहीम आखावी.  १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक शासकीय जमीन घरकुलांसाठी उपलब्ध करून देत समाजातील प्रत्येकाला घरकुल देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे, असेही ते म्हणाले.

 समाजातील प्रत्येक घटकाला विविध योजनरुपी लाभातून समृद्ध करण्याचा शासन सातत्याने प्रयत्न करत असून शासनाच्या प्रत्येक उपक्रमात जिल्हावासीयांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी केले.

  जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अहिल्यानगर जिल्हा सातत्याने अग्रेसर आहे. समाजातील एकही गोरगरीब घरापासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. सामाजिक योजनांतून सामान्यांना लाभ देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पालकमंत्री श्री.विखे पाटील नेहमीच आग्रही असून त्यांच्याच पुढाकाराने शेती महामंडळाची जमीन घरकुलासाठी उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आशिष येरेकर म्हणाले, गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचं काम प्रधानमंत्री आवास योजनेतून होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक मध्ये जिल्ह्याला ५८ हजार ६६९ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५५ हजार ४९५ घरकुले पूर्ण करण्यात यश मिळाले. याच योजनेतून ६ हजार ९४८ भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात आले. अमृत महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्याला राज्यात प्रथम येण्याचा बहुमानही मिळाला. लाभार्थ्यांना दर्जेदार घर उभारता यावे यासाठी जिल्ह्यात १५ डेमो घरांची उभारणी करण्यात आली आहे. योजनेच्या टप्पा २ मध्ये जिल्ह्याला ८२ हजार घरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून या सर्व घरांना मंजुरी देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी  लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व १० लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी करण्यात आले.

COMMENTS