कर्जत/प्रतिनिधी : तुम्ही कितीही मोठे असले तरी इथे दबाव तंत्राचा वापर सहन करणार नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ प्रवीण घु

कर्जत/प्रतिनिधी : तुम्ही कितीही मोठे असले तरी इथे दबाव तंत्राचा वापर सहन करणार नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ प्रवीण घुलेंशी आहे. माझ्यासाठी कार्यकर्ता तोलामोलाचा आहे. सत्ता नसतानाही स्वाभिमानाने राहणारे व जातीयवादाला थारा न देणारे हे संघटन आहे, असल्याची ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी दिली.
कर्जत व जामखेड तालुक्यातील पै. प्रवीण घुले मित्र मंडळाच्या वतीने आयोजित स्नेहसंवाद बैठकीत ते बोलत होते. सरपंच विलास निकत, राजमाता जिजाऊ ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश तनपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेंद्र धांडे, विजय मोरे, गुलाब खोसे, श्रीराम गायकवाड, ओंकार तोटे, राजू बागवान, रणजीत नलवडे, दादा सुरवसे, अमोल भगत, माजी सरपंच बाळासाहेब लोंढे यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घुले पुढे म्हणाले, निष्ठावान आणि स्वाभिमानी कार्यकर्ता हेच माझे शक्ति स्थळ असून त्यांच्याच सहकार्यातून विविध पद उपभोगता आली तसेच त्यांच्या विविध कामासाठी पुढाकार घेत त्याची सोडवणूक करण्यात यश आले याचे समाधान आहे. मी नेता नव्हे तर कार्यकर्ता असून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हीच माझी श्रीमंती आहे. एका हाकेवर आपण दर्शवलेल्या प्रचंड उपस्थितीमुळे मी भारावून गेलो आहे. नवे पर्व आले, मात्र सर्वांचाच अपेक्षाभंग झाला. माझ्या काही जीवाभावाच्या लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. मात्र हे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर असून राजकीय द्वेषामधून कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. त्यास जशास तसे उत्तर देण्याची क्षमता आणि ताकद माझ्यात आहे. सर्वांच्या समन्वयातून पुढील राजकीय दिशा ठरवली जाईल. यावेळी धनगर समाजाचे नेते आदेश शेंडगे, कृष्णा लोखंडे, नजीर सय्यद, विष्णु महाराज परदेशी, ओंकार गायकवाड, प्रशांत गायकवाड आदींची भाषणे झाली. माजी सरपंच बाळासाहेब लोंढे यांनी प्रास्ताविक केले. सुरेश ख्रिस्ती यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अखेरच्या श्वासापर्यंत घुलेंसोबत : निकत
सरपंच विलास निकत म्हणाले, आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रवीणदादा घुले यांच्याबरोबर आहोत. आमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आलेल्या सर्व अडचणी सोडण्याचे काम आजपर्यंत त्यांनी केलेले आहे. त्यामुळे आम्ही सर्व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासवेत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून राहू.
COMMENTS