कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकर

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला. इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, माजी आमदार राजेश पाटील, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, खो-खो या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणार्या कै.भाई नेरूरकर यांचे महाराष्ट्रात खो-खो च्या विकासासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने कै. भाई नेरूरकर यांच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरणही त्यानित्ताने होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात खो-खो या खेळाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय स्पर्धेला 25 लाखाची वाढ करुन एक कोटी केली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा म्हटलं की हार-जीत होत असते. परंतु जिंकण्या बरोबरच हार स्वीकारण्याचीही ताकद हवी. सगळ्या खेळाडूंच्या वर्तनामुळे खेळ आणि खेळाडू दोघांचाही गौरव वाढला पाहिजे. त्याचबरोबर आपली क्षमता पूर्णपणे पणाला लावून तुम्ही सगळ्यांनी खेळलं पाहिजे. खो-खो हा वेगाचा, चपळतेचा खेळ असून या खेळाचं दर्जेदार दर्शन आपल्याकडून या स्पर्धेच्या निमित्ताने इचलकरंजीच्या परिसरातल्या क्रीडा रसिकांना मिळालं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांनी खेळाडूवृत्ती जोपासली पाहिजे. इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी, रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच सर्व अधिकार्यांचे कौतुक करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आपण सर्व मिळून खो-खो च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया. जानेवारीमध्ये भारताने जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू वैष्णवी पवार हिचेही विशेष कौतुक त्यांनी केले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यामध्ये क्रीडा कामगिरीत कोल्हापूर जिल्ह्याचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, या जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, अनेक खेळाडू, अनेक नामवंत, म्हणजे खाशाबा जाधव पासून ते हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, गणपतराव आंधळकर, दादू चौगुले, याच भूमीतील ऑलिंपिक जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, टेबल टेनिस खेळाडू शैलेजा साळुंखे, नेमबाज स्वप्नील कुसाळे अशा अनेक खेळाडूंनी या जिल्ह्यामध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
COMMENTS