भोगी असणारा योगी कसा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भोगी असणारा योगी कसा !

धर्मांध राजकारणाची नशा चढली की, शब्दांचा तात्विक अर्थ कळत नाही; आता हेच बघा ना, की योगी आणि भोगी यातला भेदच कळत नसल्यामुळे आता या शब्द संकल्पनांची मु

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी गावात 23 बिअर शॉपींना ना हरकत
डोंबिवलीतील मोहने नागरी आरोग्य केंद्र परिसरात गोवरचा उद्रेक स्पॉट 
उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला आज सुरूवात

धर्मांध राजकारणाची नशा चढली की, शब्दांचा तात्विक अर्थ कळत नाही; आता हेच बघा ना, की योगी आणि भोगी यातला भेदच कळत नसल्यामुळे आता या शब्द संकल्पनांची मुक्ताफळे राज ठाकरे यांनी उधळली. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात सत्तेत कुणीही योगी नाही, तर, नुसते भोगी बसलेत! आता सत्ता आणि योगी या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत, हे त्यांना कुणी सांगावं. नाही म्हणायला, आम्हाला असं वाटत होतं की, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप हे सगळे सत्तेच्या भोवती भिंगा घालत असताना राज ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेसाठी स्वतंत्र राजकारण करून सत्ता घेतील आणि महाराष्ट्राचे नवनिर्माण होईल, अशी भाबडी आशा आम्हांला लागून आहे. परंतु, त्यांनी वरिल चार पक्षांसारखेच स्वतःच्या पक्षालाही करायचं ठरवलं, त्याला आपण तरी काय करणार! महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण तेही उभारू शकत नाही, हेच खरे. असो. पण, आज त्यांनी योगी –  भोगी या यमक जुळलेल्या शब्दांत महाविकास आघाडीवर केलेली टीका ही निरर्थक वाटली. म्हणजे भाषेच्या अनुषंगाने त्यात काहीही अर्थ वाटला नाही. भोगी हा शब्द तसा सरळ. म्हणजे कोणत्याही गोष्टीत शिरणे म्हणजे तिथला भोग घेणे. भोग याचेही दोन अर्थ उलगडतात. पहिला भोग म्हणजे सत्ता, संपत्ती आणि जे काही भोगायचे ते सुखासिन जगण्यासाठी त्या अर्थाचा भोग. तर, दुसरा म्हणजे सुखासिन जगण्यासाठी जे भोग घेतले ते इतरांचे शोषण करून, त्रास देऊन घेतले जातात असं समजून मग त्याचे दुष्परिणामही समोर येतात. ते दुष्परिणाम म्हणजे दुसरा भोग. या दोन्ही अर्थांनी एखाद्याला भोगी म्हणतात. परंतु, राज यांनी थेट महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना भोगी म्हणत योगीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला जो अतिशय निरर्थक आहे. योगी याचा तात्विक आणि शाब्दिक अर्थ कळले नाहीत की मग भल्याभल्यांची गत केविलवाणी होते. तशी ती त्यांचीही झाली. योगी हा दार्शनिक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ केवळ भाषिक नाही तर अनुभूतीवर आधारलेला आहे. अनुभूती ही कधीही वाच्यता किंवा चर्चा करण्याचा विषय नसतो. तो अर्थ स्वतः अनुभवा लागतो. अनुभव घेण्याची स्थिती ती अनुभूती. योगी या शब्दाला वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथात वेगवेगळ्या अर्थाने विषद केले असले तरी त्याचा अर्थप्रकटनाचा सार हा एकच असतो अन् तो म्हणजे शरीर आणि मनाला एका अवस्थेत आणण्याचा योग. असा योग करणारा तो योगी. योगी ही संन्यस्त अवस्था. संन्यस्त तोच व्यक्ती होतो जो कोणत्याही पाशात अडकत नाही. पाश विरहित व्यक्तीच संन्यास घेते. भौतिक जीवनाच्या सर्व अभिलाषा टाकून किंवा त्यागून दिलेल्या असतात. भौतिक जगातील कोणतेही आकर्षण अशा व्यक्तिमत्वाला राहत नाही. चित्तातील स्मृतींमध्ये ध्यानस्थ होवून जाणे आणि स्वतःच्या अंतर्यामी बाबी जाणणे किंवा तटस्थपणे पाहणे. यासर्व सखोल अर्थाने जर आपण विचार केला तर राज ठाकरे यांना अभिप्रेत योगी यात दिसतात का? योगी हा स्वतः बरोबर ब्रह्मांड जाणतो. राजकीय सत्तेचे आकर्षण संन्यस्त साधूला का रहावे? ज्याने राजकीय सत्तेचे आकर्षण ठेवले तो सर्व भोगांना भोगतो. या अर्थाने कोण योगी अन् कोण भोगी याचे तारतम्य लागू शकत नाही. त्यामुळे, राज ठाकरे यांनी योगी आणि भोगीची केलेली तुलना अत्यंत गैरलागू आणि निरर्थक आहे. खऱ्या योगीला माणंसामाणसात भेद करता येत नाही. कारण तो जाणतो सारीच माणसे समान आहेत. उलट माणसांना एकमेंकांवर प्रेम करायला शिकवतात. त्यांना धर्म आणि जातीत वाटून द्वेष करणार नाही. योगी नावाच्या सत्ताधाऱ्याकडे असे काहीही नाही. सत्तेतील योगी माणसाला धर्म आणि जातीत विभाजित करून त्यांना एकमेकांच्या द्वेषावर उभा करतोय! हिंसा, छळ, सामाजिक अत्याचार असीम पातळीवर ज्यांच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात आहेत, असा सत्ताधारी नावाने योगी असला तरी व्यवहार, तत्व आणि अनुभूतीतील योगी नाही, हेच खरे. राज ठाकरेंनी सत्तेतील महाविकास आघाडीच्या नेत्यांना भोगी ठरविण्याआधी त्या योगींची सिध्दता सिध्द करावी!

COMMENTS