महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा निवडणुकीचा हंगाम सुरु होतो तेव्हा सर्वच पक्षाचे प्रमुख किंवा प्रवक्ते जातीय द्वेशाच्या वावटळी उडवूंन देत असल्याचे पा
महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा निवडणुकीचा हंगाम सुरु होतो तेव्हा सर्वच पक्षाचे प्रमुख किंवा प्रवक्ते जातीय द्वेशाच्या वावटळी उडवूंन देत असल्याचे पाहावयाला मिळते. किंबहुना कुठल्याही निवडणुकीच्या आधी जातीय वातावरण तापवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम महाराष्ट्रासह देशभरात होत असते. लोकशाहीचा उत्सव म्हणून जसे निवडणूक प्रक्रियेकडे आपण पाहतो असतो. अगदी त्याप्रमाणे राजकीय पक्षांचेही मतदारांना वेड्यात काढण्याचे कार्यक्रम ठरलेले असतात. मग असे कार्यक्रम कधी दसरा मेळाव्याला असतात तर कधी पाडव्याला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असाच एक कार्यक्रम नुकताच शिवाजी पार्कवर आयोजित करून धार्मिक आणि जातीय मुद्यावर भाष्य केले. आता या मुद्यावरून सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका राज्यातील माध्यमांना आठ- दहा दिवस चघळता येईल हे नक्की. आणि हे सर्व राजकीय पक्षांना हवे असते. कारण लोकांच्या मनात ‘जात’ मजबूत करण्याची ही एक प्रक्रिया असते. या जातीय राजकीय समीकरणाचा उहापोह करणे अग्रक्रमाचे. राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही ते म्हणाले. ठाकरे कुटुंबाचा इतिहास तपासला तर प्रबोधनकार ठाकरे यांनी हिंदू धर्मावर आणि ब्राम्हणांवर केलेला घणाघात जगजाहीर. पण ज्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला प्रबोधनकार ठाकरे यांनी झोडपून काढले त्यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे पुढे हिंदुहृदय सम्राट झाले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला धार्मिक संदर्भ आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज ठाकरे जेव्हा म्हणतात की, मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे. म्हणजे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी विसंगती प्रमाणे नव्हे काय? दुसरे असे की, या राज्यात आणि देशात धर्मांध कोण आहे हे राज ठाकरे यांनी सांगितले पाहिजे. आणि त्यांनी धर्मांध शक्तीचे राजकारण करणारांच्या पंगतीत बसण्याचे कारण नाही. मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील या राज ठाकरेंच्या धमकीवर अनेकजण व्यक्त झाले ते ठीकच. पण, मशिदीवरील भोंगे काढल्यावर मंदिरावरचे भोंगेही काढावे लागतील. मग, मंदिरावरचे भोंगे आधी काढणार की, मशिदीवरचे? जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा हे राज ठाकरे यांचे विधान योग्यच. पण, हिंदू धर्माचे संस्थापक कोण? राज्यात आणि देशात जेव्हा सर्वच राजकीय पक्षाचे नेते जातीवर आणि धर्मावर बोलत असतात तेव्हा, राजकारणाच्या मोठ्या हालचाली सुरु असतात. मग ती प्रक्रिया सत्तेत येण्याची असेल किंवा कुणाला सत्तेतून खाली खेचण्याची. पण कुणी सत्तेत आले काय आणि गेले काय येथे सर्वच जातीवादी आणि धर्मवादी आहेत त्याचे काय? देशात आणि राज्यात मानव हा केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करणाऱ्या पक्षाची किंवा नेत्याची आज देशाला गरज आहे. असे नेते किंवा पक्ष आपल्या देशात निर्माण व्हायला आता वेळ लागणार नाही. कारण आता लोकांना धर्माचे पोकळ पांडित्य लक्षात येत आहे. धर्माचा प्रभाव कमी झाल्यामुळे निधर्मी राजकीय पक्षाला आपल्याकडे चांगले वातावरण निर्माण झाल्याचे सत्य आहे. त्यामुळे सध्या जातीवर आणि धर्मावर होणारे राजकीय भाष्य परिणामकारक नाही. जमिनीचे एखादे लहान क्षेत्र सौर प्रारणामुळे खूप तापले की, त्या क्षेत्रावर न्यूनदाब (कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण होते. त्यामुळे संनयन (अभिसरण) सुरू होऊन हवेस घूर्णता (चक्राकार गती) प्राप्त होते. चक्रीय गती असलेल्या वाऱ्याच्या लहान वादळास वावटळ असे म्हणतात. आपल्या राज्यात जे धार्मिक आणि जातीय राजकारण सुरु आहे ते एकप्रकारचे वावटळ आहे. वावटळ वादळात कधी लुप्त होते हे कळत सुद्धा नसते. हे असते वावटळचे अस्तित्व. त्यामुळे वादळ बनायचे की, वावटळ राहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
COMMENTS