छत्रपती संभाजीनगर : दिव्यांग बांधवांसाठी समाजाने सहानुभूतीने नव्हे, तर समान संधीच्या दृष्टिकोनातून सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्व

छत्रपती संभाजीनगर : दिव्यांग बांधवांसाठी समाजाने सहानुभूतीने नव्हे, तर समान संधीच्या दृष्टिकोनातून सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे केले. समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि एस. आर. ट्रस्ट, मध्यप्रदेश अलीमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी सक्षम संस्था, डॉ. हेडगेवार रुग्णालय संचलित संत रोहिदास आरोग्य केंद्र येथे ऑन द स्पॉट कृत्रिम हात, पाय आणि कॅलिपर्स वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी एस.डी. चव्हाण, सक्षम संस्थेचे अध्यक्ष बी. एन. राठी, प्रा. डॉ. भगवान देशमुख, सचिव डॉ.संदीप डफळे, आरोग्य अधिकारी डॉ. रुपेश जाधव व अरविंद अवसरमल उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, या उपक्रमामुळे दिव्यांगांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल. समाजात दिव्यांगांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या शिबिरांतून त्यांच्या आत्मनिर्भरतेस चालना देता येते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग व्यक्तींना त्यांची गरज ओळखून योग्य कृत्रिम अवयव बसवले तसेच, त्याचा योग्य वापर आणि देखभालीबाबत मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले आणि आयोजकांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि त्यांना स्वयंपूर्ण जीवन जगण्यास मदत मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातून आलेल्या ८६ दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय बसविण्यात आले. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील गेल्या सहादिवसात संपन्न झालेल्या तालुकानिहाय शिबिरात पैठण १५४, गंगापूर १००, वैजापूर १२५, कन्नड १४४, सिल्लोड १२५ दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.
COMMENTS