आरोग्य यंत्रणेची कसोटी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आरोग्य यंत्रणेची कसोटी

गेल्या पावणे दोन वर्षापासून कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावामुळे सामान्य जनता हातबल झालेली पहावयास मिळाली. आता विषाणूने आपल्या जनुकिय संरचनेत बदल करून घे

धर्म काय कामाचा ?
स्वायत्त संस्थांची आजची स्थिती
लोणारकाव्याचे लोणारकार

गेल्या पावणे दोन वर्षापासून कोव्हीड 19 च्या प्रार्दुभावामुळे सामान्य जनता हातबल झालेली पहावयास मिळाली. आता विषाणूने आपल्या जनुकिय संरचनेत बदल करून घेण्यास सुरुवात केल्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांपुढे पेच प्रसंग उभा राहिला आहे. हा पेच प्रसंग सोडविताना जगभरातील आरोग्य यंत्रणेचे वाभाडे मात्र निघाल्याचे पहावयास मिळाले. कोरोनाच्या नव्याने झालेल्या जनुकिय बदलास शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉन असे नामकरण केले आहे. हा कोरोनाच्या डेल्टा पेक्षा भयानक असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतासारख्या विकसनशिल देशाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. सन 2008 पासून जगभरात स्वाईन फ्ल्यू सारख्या विविध आजारांमुळे जगभरातील मानवास औषध मिळण्यापूर्वीच मृत्यूला कवटाळावे लागले आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला औषध मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागली होती. त्यातच गेल्या पावणेदोन वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरातील बाजारपेठामध्ये अस्थिरता आली आहे. या काळात मात्र, रुग्णालयीन व्यवस्थेत इतका बदल झाला की, विनाकारण उपचारासाठी रुग्णालयात गर्दी करणार्‍या शौकीन रुग्णांचे मनोरुग्णांमध्ये रुपांतर झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. भारतातील लोकांना आरोग्य सुविधा, शिक्षणाची सुविधा तसेच सुरक्षिततेची हमी देण्याच्या बाबतीत सर्व सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत स्वच्छ व र्निजंतूक पाणी उपलब्ध करून देता-देता सरकारी यंत्रणा घायकुतीला आलेली आपणास पहावयास मिळते. त्यातच आलेली एखादी भीषण महामारी आरोग्य यंत्रणाच नव्हे तर भल्या-भल्यांना जगाचा निरोप घ्यायला लावत असल्याचे आपणास कोरोनाच्या साथीपासून बघायला मिळाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ओमिक्रॉनशी लढण्यासाठी देशभरात विज्ञान-आधारित धोरण आखण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. लहान बालकांपासून वयोवृद्धांचे संपूर्ण लसीकरण होण्याची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतेही लक्षणे दिसल्यास संबंधित रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. आफ्रिका तसेच युरोपमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे जगभरातील राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिकेतून आलेल्या दोन कारोना रुग्णांमध्ये कोरोनाच्या डेल्टाची लक्षणे न आढळता ओमिक्रॉनची लक्षणे आढळून आली आहेत. हा कोरोनाच्या विषाणूच्या रचनेतील जनुकिय बदल आहे. हा बदल आताच्या संसर्गापेक्षा घातक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात याचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून संबंधित देशातून येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांवर बंदी घालण्यासाठी विमान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विमान सेवा बंद ठेवली तरीही हा विषाणू कशाच्या माध्यमातून मानवाच्या शरिरात जात आहे याबाबत आजही माहिती सांगता आली नाही. स्वामिनाथन म्हणाल्या की, हा प्रकार डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला ‘चिंतेचे प्रकार’ म्हणून संबोधले आहे. हा कोविडच्या मागील प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असण्याची शक्यता आहे. मात्र, तज्ञांना अद्याप ओमिक्रॉनच्या गंभीरतेचे स्वरुप स्पष्ट झाले नाही. संशोधन सुरु असूनही यापुर्वीची परिस्थिती पाहता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यापलीकडे शास्त्रज्ञ काहीही सांगू शकत नाहीत. ओमिक्रॉनच्या उदयामुळे जागतिक चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या रोगामुळे रखडलेल्या आर्थिक सुधारणा पुन्हा एकदा कोलमडण्याच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे. या चिंतेमुळे जगभरातील देशांमध्ये प्रवासावर निर्बंधांची गरज बनले. याचा आर्थिक बाजारपेठांमध्ये देखील याचे परिणाम होत आहे. भारतातील शासकिय आरोग्य यंत्रणा सलाईनवर असताना अशा प्रकारच्या महामारीने पुन्हा तोंड वर काढल्यास सामान्य माणसाला आपल्या जिवाला मुकावे लागणार आहे. याच कालावधीत खासगी आरोग्य यंत्रणेने मात्र आपली पोळी भाजण्याचे काम चांगले केले. कसलाही रुग्ण आला की त्याचा बकरा बनविण्याचे काम केल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आकारलेल्या बिलांची तपासणीसाठी शासकिय अ‍ॅडिटर नेमण्याची पाळी शासनावर आली आहे. तसेच शासकिय यंत्रणेच्या काही जबाबदारीच्या पदावर काम करत असलेल्यांनी तर शासकिय तसेच खाजगी आरोग्य यंत्रणेच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम केले. त्यामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी कक्ष उभारणीपासून ते कक्ष चालवण्यास देण्याच्या भानगडीमध्ये कोठेही सेवाभाव दिसला नाही. उलट प्रत्येक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकाला रुग्णाला होत असलेल्या त्रासाची माहिती न देता त्यांना दूर ठेवण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे आपल्या रुग्ण बरा होणार की नाही याबाबत कोणतासही विश्‍वासार्हता राहिली नाही. अशाच स्थितीत आता कोव्हिड सेंटरचे विजबिल तसेच खरेदी केलेल्या औषधांची देणी आजही बाकी आहेत. तसेच कोव्हीड सेंटर बंद करण्याचा आरोग्य यंत्रणेने घाट घातला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बदलत्या रुपाला आपली आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे प्रतिकार करणार हा संशोधनाचा विषय आहे.

COMMENTS