Homeताज्या बातम्यादखल

माणूसपणाची मूल्य गमावली काय !

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साधनाला दहावीमध्ये तब्बल ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते.

व्यवस्थेला प्रश्न विचारणारी विवेकी पिढी घडली पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध – उपमुख्यमंत्री फडणवीस
लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साधनाला दहावीमध्ये तब्बल ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते. मात्र, डॉक्टरच्या शिक्षणासाठी होणाऱ्या नीटच्या पूर्वी सराव परिक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांना राग अनावर होऊन त्यांनी साधनाला थेट लाकडी खुंट्या ने मारहाण केली. ‘’नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे काय मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार?’’ अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा, मुलगी साधनाने केलेल्या ‘’तुम्हालाही कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी शिकून कुठे कलेक्टर झालात?’’, असे उलट उत्तर दिले, असे स्पष्ट झाले.‌परंतु, ही घटना केवळ ऐकून, वाचून सोडून देण्याची नसून यावर पालक आणि पाल्यांना अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. सध्याच्या काळात स्पर्धा सर्वच क्षेत्रात जीवघेणी बनली आहे. त्यामुळे, पालक पाल्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात स्पर्धात्मक शिक्षणाचा आग्रह धरतात. यात, मुलांच्या इच्छाशक्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. त्यातच, क्लासेस सारख्या व्यावसायिक प्रकारांनी तर, मुलांचे आयुष्य कमालीचे निराशाजनक बनवले आहे. देशातील स्पर्धा परिक्षांचे क्लासेस घेणारे बक्कळ पैसा ओढण्यासाठी आपलं व्यावसायिक काम करतात. परंतु, याच खाजगी क्लासेस मध्ये एक तंत्र आले आहे की, फी प्रचंड प्रमाणात उकळायची. फी च्या आकारावरून पालकांना ते क्लासेस गुणवत्तेचे वाटतात. मात्र, ही गुणवत्ता दाखवण्यासाठी ते सराव परिक्षांचा सपाटा लावतात. विद्यार्थी बऱ्याचवेळा या सराव परिक्षांना सवय म्हणून गांभीर्याने घेत नाहीत. कारण, मुख्य परिक्षेसाठी त्यांना अभ्यासासाठी वेळ हवा असतो. परंतु, साधना भोसले या तरूणीला सराव परिक्षा देताना दुर्लक्षित करणे अक्षरशः तिला मृत्यू पंथाला घेऊन जाणारे ठरले. वास्तविक, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले तिचे वडील हे मुख्याध्यापक आहेत. परंतु, आपल्या पोटच्या मुलीला शिक्षणाची सक्ती करताना किती यातना द्यायच्या याचा साधा धरबंध या शिक्षक असणाऱ्या बापाला असू नये, याच मोठं वैषम्य वाटतं. खरेतर, मुलीचा जीव घेणाऱ्या या बापाला शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करायला हवे. अशा शिक्षकांच्या अस्तित्वामुळे अनेक पालकांचे जीव टांगणीला लागतील. कारण, कमी गुण मिळाले त्यामुळं वडील धोंडीराम संतप्त झाले आणि त्यांनी कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली. घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली. या हल्ल्यात साधनाच्या डोक्याला जबर मार बसला. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्‍या दिवशी सकाळी तिचे वडील योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. इतकी क्रुरता स्वभावात भिनलेल्या व्यक्तीला शिक्षक आणि बाप यामधलं अंतर उमगू नये, ही भीषण बाब कोणत्याही पालकाला सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत ऑलवेल काहीच नाही, याची नांदी ठरते. मात्र, शिक्षकांचा हा भयंकर प्रताप म्हणजे मुलांना पालकांनी शाळेत पाठवायचं की नाही, या दोलायमान स्थितीत नेणारे आहे. त्यामुळे, राज्याच्या शिक्षण विभागाला आमची सूचना आणि आवाहनही आहे, की, त्यांनी राज्यातील कोणत्याही शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण करण्याची बाब थेट फौजदारी खटल्यात आणावी. कारण, आपण माणूस म्हणून अधांतरी असणाऱ्या मूल्यांवर अडकून पडलो आहोत. 

COMMENTS