Homeताज्या बातम्यासंपादकीय

हरितक्रांती  : भारताचे नियोजन, शेतकऱ्यांचे श्रम आणि स्वामीनाथन यांचे मार्गदर्शन!

 देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्या आणि जमिनीच्या विभागणीतून भारताच्या हिश्यात एकूण जमिनीचा हिश्यापेक्षा लोकसंख्येचा हिस्सा अधिक वाट्याला आला. याम

भाजपचे ओबीसीमय राजकारण !
ऐतिहासिक स्वप्नांची राख रांगोळी!
वीज कर्मचारी संप आणि….. 

 देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकसंख्या आणि जमिनीच्या विभागणीतून भारताच्या हिश्यात एकूण जमिनीचा हिश्यापेक्षा लोकसंख्येचा हिस्सा अधिक वाट्याला आला. यामुळे सुरुवातीला अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची समस्या भेडसावू लागली. देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्याची रणनीती, तत्कालीन शासनासमोर  अग्रक्रमाने उभी होती. सुरुवातीला अमेरिकेबरोबर केलेल्या करारानुसार गव्हाची आयात करण्यात आली. परंतु, लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणात ही उपलब्धता कमी होती. त्याचबरोबर त्या गव्हाचा दर्जाही निकृष्ट प्रतीचा होता. हे सर्व लक्षात घेऊन तत्कालीन कृषी मंत्रालयाचे सल्लागार एम. एस. स्वामीनाथन यांनी अमेरिकन कृषीतज्ञ डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना निमंत्रित करण्याचा सल्ला दिला. त्यांनी भारतात आल्यानंतर मेक्सिको या लॅटिन अमेरिकन देशातील गहू आणि मका या दोन पिकांची निवड करून, त्यांचा भारतात प्रयोग करण्याचे ठरवले. या प्रयोगातूनच भारताच्या हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मेक्सिकोतील गहू आणि मक्याच्या या बियाण्यांना अधिक पाण्याचा प्रदेश हवा होता. त्यादृष्टीने विचार करता पंजाब या राज्याची निवड करण्यात आली. पंजाबमध्ये पाण्याची मुबलकता, थंड हवा हे पाहता त्या ठिकाणी गव्हाच्या पिकाची फार मोठी भरभराट झाली. त्याबरोबरच देशामध्ये कृषी तंत्रज्ञान, त्यासाठी लागवडीखालील क्षेत्र, आधुनिक बी बियाणे शिवाय रासायनिक खते आणि पाण्याचे नियोजन या सगळ्याच गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने करता येऊ लागल्या. १९६० ला पंजाब मध्ये सुरू केलेला प्रयोग इतका सफल झाला की, देशामध्ये हरितक्रांती झाली आणि या हरितक्रांतीमुळेच देशातील अन्नधान्याची टंचाई ही दूर करण्यात यश आले. आज पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये गहू आणि तांदूळ  मुबलक प्रमाणात उत्पादीत होतात. 1955 साली गव्हाची आयात करणारा भारत देश, या हरित क्रांतीमुळे गव्हाची निर्यात करणारा देश देखील बनला. यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा आणि श्रमाचाही तितकाच उपयोग झाला. परंतु, ज्या पद्धतीने एम. एस. स्वामीनाथन यांनी भारतीय भूमीत शेतीचा प्रयोग कसा करावा, याचं आधुनिक आणि तांत्रिक शिक्षण घेत असतानाच अमेरिकेतल्या योग्य व्यक्तीची निवड करणे, ही बाब फार महत्वपूर्ण ठरली. १९६० नंतर या देशाने शेतीच्या क्षेत्रात मागे फिरून पाहिले नाही. साठीच्या दशकात ही गोष्ट भारतात घडत असतानाच महाराष्ट्रामध्ये देखील १९७२ साली अतिशय भीषण दुष्काळ पडला होता.  त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दोन वर्षात महाराष्ट्राचा दुष्काळ हटविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात देखील जलसिंचनाच्या व्यवस्था निर्माण करण्यात येऊन महाराष्ट्राची भूमी ही सुजलाम-सुफलाम करण्यात यश मिळवलं. अर्थात, आज हा विषय चर्चेला घेण्यामागे हेच कारण आहे की, ज्या एम. एस. स्वामीनाथन यांनी भारताला योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे उत्पादन प्रत्यक्षात येऊ शकले. फाळणी झालेला देश हा नव्या परिस्थितीत कार्यरत असताना अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्याची प्रक्रिया, ही निश्चितच देशाचा स्वाभिमान वाढवणारी बाब आहे. त्यामध्ये एम. एस. स्वामीनाथन यांचा योग्य मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच १९६० साली देशात हरितक्रांतीची बीजे रोवली गेली. आज एम एस स्वामीनाथन दीर्घ आयुष्य जगल्यानंतर वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. एक कृषी संशोधक म्हणून त्यांच्याकडे पाहताना ही बाब देखील गांभीर्याने लक्षात घ्यावी लागेल की, त्यांचे आयुष्य अतिशय निरोगी राहिले. परंतु, पंजाब मध्ये जी हरितक्रांती झाली त्या हरितक्रांतीनंतर आज पंजाबच्या धरतीवर कॅन्सर एक्सप्रेस सारखी गाडी चालवावी लागते. त्यामुळे अतिशय आधुनिक या शेतीच्या जगामध्ये या बाबींचा आता नव्याने विचार करण्याची गरज आहे. हरितक्रांती जैसे थे ठेवून या नव्या आव्हानांना कसे सामोरे जाता येईल किंवा ही नवी आव्हाने किंवा समस्या कशा सोडवता येतील, त्या दृष्टीने विचार करणे आणि कृती करणे हीच एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली ठरेल.

COMMENTS