जामखेड प्रतिनिधी 'वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही' हे विधान खरे ठरवत जामखेड तालुक्यातील आजी-आजोबांनी साक्षरत
जामखेड प्रतिनिधी
‘वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, शिकण्यासाठी कधीही उशीर होत नाही’ हे विधान खरे ठरवत जामखेड तालुक्यातील आजी-आजोबांनी साक्षरतेच्या चाचणीत आपली हुशारी सिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ अंतर्गत २३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचा निकाल नुकताच जाहीर झाला. तालुक्यातील वयोवृद्ध निरक्षर
नागरिकांनी या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील १३८ शाळांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये एकूण १,१७६ निरक्षर व्यक्तींनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने वयोवृद्ध नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. नातवंडे ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्या शाळांमध्येच आजी आजोबांनी परीक्षा देऊन शिक्षणाची आस कायम असल्याचे दाखवून दिले. या चाचणीचा उद्देश नागरिकांना मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करून देण्याचा होता. या उपक्रमांतर्गत वयोवृद्ध, गृहिणी, शेतकरी, कामगार अशा अनेक घटकांनी सहभाग घेत समाजात साक्षरतेबाबत सकारात्मक संदेश दिला आहे. जामखेड तालुक्यात साक्षरतेचा वाढता टक्का आणि नागरिकांचा सहभाग हे सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक ठरत आहे.साक्षरतेबाबत सकारात्मक संदेश दिला आहे.
आता मी स्वतःचे नाव लिहू शकते
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील अहिल्याबाई मोहळकर या आजीने सांगितले की, आधी अंगठा लावत होते, पण आता नाव लिहिता येते. मला वाटायचे, मी कधीच शिकू शकणार नाही. पण शिक्षकांनी धीर दिला, सराव घेतला आणि आज मी नाव लिहून दाखवू शकते. हे स्वप्नच होते माझ्यासाठी.
यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र वितरण लवकरच
हा उपक्रम केवळ साक्षरतेचा नव्हे, तर एक नव चैतन्याचे पर्व ठरत असून शिक्षणाची गंगा आता प्रत्येक वयोगटात पोहोचत असल्याचा दिलासादायक अनुभव आहे. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या परीक्षार्थीना लवकरच अधिकृत प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती उल्हास नवभारत साक्षरता समन्वयक तुषार तागड यांनी सांगितले.
COMMENTS