आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जतला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी आमदार प्रा. राम शिंदे…पारनेरला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व शिवसेनेचे मा

कोल्हे सहकारी कारखाना कार्यस्थळावर श्रीगुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता
रेणुका आश्रमात पंचेचाळीसावा शारदीय नवरात्र महोत्सव
स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जतला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी आमदार प्रा. राम शिंदे…पारनेरला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व भाजपचे माजी आमदार वैभव पिचड…अशा तीन आजी-माजी आमदारांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आपल्या समर्थकांना नगर पंचायतीच्या निवडणुकीत ताकद देण्याच्या निमित्ताने हे आजी-माजी आमदार दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. यात कोण बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे असणार असून, या निकालावर भविष्यातील स्थानिक निवडणुकांसह लोकसभा व विधानसभेचीही बदलती राजकीय हवा स्पष्ट होणार आहे.
प्रा. शिंदे, औटी व पिचड यांची वर्षानुवर्षाची सद्दी संपवून अनुक्रमे पवार, लंके व डॉ. लहामटे यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे. हा झेंडा डौलाने फडकत आहे की नाही, हे पाहण्याची संधी या तिन्ही आमदारांना त्यांच्या तालुक्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकीत मिळाली आहे तर या झेंड्यांचा पाया भुसभुशीत झाल्याचे वास्तव मांडण्याची संधी या तिन्ही ठिकाणच्या माजी आमदारांना मिळाली आहे. या लढतींचे विशेष म्हणजे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक नगर पंचायतीच्या स्तरावर महाविकास विरुद्ध भाजप असे स्पष्ट चित्र नाही. कर्जत व अकोल्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप तर पारनेरला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचा तिसरा कोन कर्जत व पारनेरला फारसा दिसत नाही तर अकोल्यात मात्र स्वतंत्रपणे एकाचवेळी राष्ट्रवादी व भाजपला टक्कर देत आहे. त्यामुळेच या तिन्ही नगरपंचायतींसाठी मंगळवारी 21 रोजी होणारे मतदान व त्यानंतर होणारी मतमोजणी उत्सुकतेची झाली आहे.

तब्बल दोन वर्षांनी भिडले
कोरोना संसर्गाच्या काळात सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकांनंतर जिल्हा बँकेची निवडणूक वगळता कोणतीही मोठी निवडणूक जिल्ह्यात झाली नाही. नाही म्हणायला ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या थोड्याबहुत निवडी झाल्या. त्या निवडणुकांतून प्रत्येक तालुक्यातील आजी-माजी आमदारांमध्ये खडाखडी झाली. दोन्हींकडून एकमेकांची ताकद जोखली गेली. मात्र, आता होत असलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत या राजकीय ताकदीचा कस लागणार आहे. विधानसभेला मतदारांनी चूक केली की नाही केली, याचे स्पष्टीकरण कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायत निवडणुकांतून होणार आहे व या निकालावरच भविष्यात शिर्डी व नेवासे नगरपंचायत तसेच कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदा, पाथर्ड़ी, जामखेड, शेवगाव, राहाता, संगमनेर या नगरपालिकांच्या निवडणुकांतील राजकीय हवा स्पष्ट होणार आहे.

राजकीय ताकदी पणाला
कर्जतमध्ये भाजपचे प्रा. शिंदे यांना पराभूत करून बारामतीच्या पवारांनी बाजी मारल्यावर कर्जतवर आपली आता मजबूत झाल्याचा त्यांचा दावा असला तरी आपणही अजून ताकद राखून आहोत, असे प्रा. शिंदेंचेही म्हणणे आहे. पारनेरलाही लंके व औटी यांची तर अकोल्यात डॉ. लहामटे व पिचड यांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांवर नेमकी कोणाची व किती पकड आहे, हे तेथील तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणूक निकालांतून स्पष्ट होणार आहेत. अर्थात या तिन्ही निवडणुका तेथील शहरी भागातील आहेत, पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात, त्या प्रमाणे कर्जत, पारनेर व अकोले या शहरांतील राजकीय स्थिती कमी-अधिक प्रमाणात त्या तालुक्यांतील ग्रामीण भागातूनही असणार आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुकांच्या निकालांतून भविष्यातील तेथील ग्रामपंचायती, सेवा सोसायट्या व बाजार समित्या निवडणुकांचाही कल स्पष्ट होणार आहे.

रंगतदार राजकीय खेळ्या
तिन्ही नगर पंचायतींच्या निवडणुकांतून रंगतदार राजकीय खेळ्या सुरू आहेत. महाविकास आघाडीचे मंत्री व भाजपचे नेतेही प्रचारात उतरले आहेत. कर्जतला भाजपचे उमेदवार फोडाफोडी सुरू आहे तर त्याचा मौैन व उपोषणातून अनोखा निषेध भाजपचा सुरू आहे. पारनेरला राष्ट्रवादी व शिवसेना अशा पक्षीय टीकाटिपणीपेक्षा लंके-औटी अशा टिपणीवर भर दिला गेला आहे. तर अकोल्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने काँग्रेसला दूर केल्याने तेथे काँग्रेसने स्वतंत्र अस्तित्व लढाई सुरू केली आहे. त्यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी साथ दिली असून, तेथे पहिल्यांदा थोरातांनी भाजपऐवजी राष्ट्रवादीला टीकेचे लक्ष्य केले आहे.

COMMENTS