Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी येथे राष्ट्रीय अधिवेशनात बाबा बडे यांच्या ‘जीवनाचा हेलपाटा’ कादंबरीचे भव्य प्रकाशन

तलवाडा । प्रतिनिधीअखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

देशभरात मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..
शिर्डी नगरपरिषदेत  शेळके उपनगराध्यक्ष

तलवाडा । प्रतिनिधी
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी येथे दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे दहा हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या ऐतिहासिक अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बीडचे अध्यक्ष बाबा बडे यांच्या पहिल्या कादंबरीचे – ‘जीवनाचा हेलपाटा’ – प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाबा बडे हे महसूल विभागात कार्यरत असून त्यांनी तलाठी म्हणून सेवा बजावताना एक आदर्श अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतरही त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना ‘आदर्श मंडळ अधिकारी’ म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच सरकारी कर्मचारी संघटनेत जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संघटन कौशल्याची प्रभावी झलक दाखवली आहे. ‘जीवनाचा हेलपाटा’ ही बाबा बडे यांची पहिलीच साहित्यकृती असून त्यांनी यापूर्वी कोणतेही लेखन केले नव्हते. ग्रामीण साहित्य प्रकारातील या कादंबरीत ग्रामीण युवकाची संघर्षमय जीवनयात्रा प्रभावीपणे रेखाटण्यात आली आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी ग्रामीण युवकाची धडपड, अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याची वृत्ती, प्रेम आणि त्यासाठी केलेले संघर्ष, तसेच अपयशामुळे बसलेला जीवनाचा हेलपाटा – हे सर्व भावनिक व वास्तववादी शैलीत शब्दबद्ध करण्यात आले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सुभाष लांबा (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटना, दिल्ली), विश्वास काटकर (सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना), उमेश चिलबुले (अध्यक्ष, जिल्हा परिषद महासंघ), अशोक दगडे (अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना), गणेश देशमुख (कोषाध्यक्ष), तसेच अविनाश दौंड, देविदास जरारे, अनिल सूर्यवंशी, राजकुमार कदम, रामचंद्र ठोसर, सखाराम जगताप, बळीराम उबाळे यांच्यासह देशभरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा बडे यांच्या साहित्यप्रवेशाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS