सोनेगाव प्रकरणी माजी सरपंच पवार यांची चौकशीची मागणी ; उपोषणाचा इशारा जामखेड : तालुक्यातील सोनेगाव येथील निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराच्या नावान

सोनेगाव प्रकरणी माजी सरपंच पवार यांची चौकशीची मागणी ; उपोषणाचा इशारा
जामखेड : तालुक्यातील सोनेगाव येथील निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराच्या नावानेच धान्यपुरवठा झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच संतोष पवार यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास २ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नान्नज येथील माजी सरपंच संतोष उत्तमराव पवार यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान जिल्हा पुरवठा कार्यालय, अहिल्यानगर यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी काही कारणास्तव निलंबित केले आहे. संबंधित आदेशाची प्रत त्याच दिवशी तहसील कार्यालय जामखेड येथे ई-मेलद्वारे व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी टपालाद्वारे प्राप्त झाली होती.
मात्र ४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान निलंबन आदेशाची कोणतीही अंमलबजावणी तहसीलदार व पुरवठा विभागाकडून करण्यात आली नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी तहसीलदार जामखेड व तालुका पुरवठा निरीक्षक यांना लेखी अर्ज देऊन संबंधित दुकानावरील निलंबनाची तत्काळ अंमलबजावणी करून धान्य दुसऱ्या दुकानाला जोडावे व निलंबित दुकानात धान्य उतरवू नये, अशी विनंती केली होती.
तथापि, २० फेब्रुवारी २०२६ रोजी जामखेड येथील शासकीय गोदामातून सोनेगावसाठी जुन्याच निलंबित दुकानदाराच्या नावाने वाहतूक पास काढून धान्य देण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “हे सर्व नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकान निलंबित केल्यानंतरही तहसीलदार व पुरवठा निरीक्षक कायद्याच्या पळवाटा काढून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच तहसील कार्यालयात खासगी व्यक्ती बसून अधिकाऱ्यांना भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवून देत असल्याचाही आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
वरील सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी; अन्यथा २ मार्च २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS