कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील गुणवत्तापूर्ण असणार्या जिल्हा परिषदेच्या ओझरे शाळेने इतिहास घडवत केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाने दे
कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील गुणवत्तापूर्ण असणार्या जिल्हा परिषदेच्या ओझरे शाळेने इतिहास घडवत केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाने देशातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांकरीता आयोजित केलेल्या स्वच्छ विद्यालय उपक्रमात देशपातळीवर यश संपादन करून तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालय दिल्ली यांच्यातर्फे दिल्या जाणार्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी या वर्षी संपूर्ण देशातून 39 शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 3 शाळांची निवड झाली. यात ओझरे शाळेने अभिमान वाटावा अशी कामगिरी साधली आहे. दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते 19 नोव्हेंबर रोजी शाळेला सन्मानीत केले जाणार आहे. ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या ओझरे शाळेची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड होऊन शाळेने देश पातळीवर जावळीची पताका फडकवत यशचा डंका वाजवला आहे. जावळीच्या दुर्गम डोंगराळ भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची घोडदौड दिल्लीपर्यंत पोहचली असून शिक्षण विभाग आणि समस्त जावलीकर यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
जिल्ह्यातील एक गुणवत्तापूर्ण अशी ही जिल्हा परिषदेची ओझरे शाळाआहे. आजपर्यंत शाळेने शिष्यवृत्तीची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. येथील परिसर, इमारत आकर्षक असून डिजिटल क्लासरूम, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, आकर्षक बगीचा असा सुविधांनी परिपूर्ण असा आहे. या सर्व बाबींच्या परिपूर्णतेने आज शाळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत होत आहेत. या नेत्रदीपक यशासाठी मुख्याध्यापक विजय धनावडे, शिक्षक बळवंत पाडळे, संगीता म्हस्के, नेहा जाधव, आण्णासाहेब दिघे यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, जय हनुमान झांज पथक, नेहरू युवा मंडळ विकास तरुण मित्र मंडळ, वेण्णा फाउंडेशन दुर्गादेवी मित्र मंडळ, धम्मज्योत तरुण मंडळ यांच्याकरिता मोलाचे सहकार्य मिळाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, गटशिक्षणअधिकारी कल्पना तोडरमल, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख संपत धनवडे, माजी केंद्र प्रमुख विजय सपकाळ, अध्यक्ष दत्ता लकडे, उपाध्यक्ष दर्शना कदम, मुख्याध्यापक विजय धनावडे, माजी मुख्याध्यापक पांडुरंग सपकाळ यांनी शाळेचे अभिनंदन केले.
COMMENTS