अखेर राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. म
अखेर राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र कोश्यारी यांच्या राजीनाम्याने आणि त्यांच्या वक्तव्याने जे मोहोळ उठले होते, ते शांत होणार असले तरी, बरेच प्रश्न अनुत्तरितच राहतांना दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसापासून महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य तसेच भाजप प्रेमी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घटनेला अनुसरुन काम न केल्याच्या आरोपानंतर चर्चेत आले होते. अखेर भाजप सरकारने आगामी लोकसभा, विधानसभासह महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्यपालांना बदलण्याचा घाट घातला आहे. या प्रकाराने महाराष्ट्रातील जनतेकडून सहानुभूति मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजप सरकारने एकाच वेळी 13 राज्यपालांच्या बदलाची घोषणा करून धक्का दिल्याचे पहावयास मिळत आहे. अर्थात असे करून काही नवीन साध्य करण्याचा त्यांचा हेतू आहे की, अडचणीत येणारे सरकार सावरण्यासाठी केलेला कवायत प्रकार असल्याची चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर मात्र, सर्व पक्षांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे पहावयास मिळत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही सोडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी महाराष्ट्राची सुटका झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकारातून एकच समोर येत आहे की, ज्येष्ठ नेतेही राज्यपालांच्या वागण्यावर संतुष्ट नव्हते. अर्थात विरोधाला विरोध म्हणून नव्हे पण राज्याच्या जनतेची विकास कामे रखडल्याने राज्याचा विकास दर कमी होत असल्याचेही पहावयास मिळत आहे. वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवर्यात सापडणारे भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राजीनामा सरकारने स्विकारला. त्यांच्या जागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आली. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. वाजपेयी सरकारच्या काळात मंत्रीपद सांभाळले होते.
एकाच वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राचा नंबर लागला. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते. बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. सन 2019 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. सन 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते. व्यक्ती अनुभवी असल्याची चर्चा आहे मात्र, मागचे दिवस पुढे येवू नयेत अशीच आशा सर्व राजकिय पक्षांनी व्यक्त केली आहे.केंद्रात सत्तेत असलेल्या सरकारने अचानक घेतलेला हा निर्णय भविष्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा होवू लागली आहे. राजपाल या पदास घटनात्मक दर्जा आहे. असे पद रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच नवीन राज्यपालांच्या नावाची घोषणा झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील विकास कामांवर विपरित परिणाम झाल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. एकंदरीत सरकार सावरण्यासाठी राज्यपालांची बदली करण्याने काय सिध्द होणार आहे, त्यांची कृती महत्वाची आहे. त्यांची वक्तव्ये ही समाजास राज्याच्या हिताची असायला हवी असे मत जानकारांनी नोंदवले आहे.
COMMENTS