अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोले या जिल्ह्याच्या आदिवासी भागातच सुरू करावे अशी मागणी अकोलेकरांनी के

अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोले या जिल्ह्याच्या आदिवासी भागातच सुरू करावे अशी मागणी अकोलेकरांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे राज्यात गतवर्षी दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली, मात्र त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश नव्हता. जिल्ह्यातील चौंडी येथे नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्या निर्णयानंतर या महाविद्यालयासाठी जागेचा शोधही सुरू झाला आहे. जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक स्थिती आणि जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सुविधा लक्षात घेता हे महाविद्यालय आदिवासी क्षेत्रात म्हणजे अकोले तालुक्यात होणे योग्य ठरेल. भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या सह्याद्रीतील आदिवासी पट्ट्याच्या साधारण मध्यावर अकोले तालुका आहे.त्यामुळे अकोल्याबरोबरच शेजारच्या जुन्नर इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागालाही याचा फायदा होईल.
जिल्ह्यात इतरत्र खासगी वैद्यकीय महाविद्यालये तेथे निर्माण होऊ शकतील. मात्र आदिवासी अकोले तालुक्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नजीकच्या पाच पंचवीस वर्षातही आदिवासी भागात वैद्यकीय महाविद्यालय येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अकोल्यात वैद्यकीय महाविद्यालय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारखी आरोग्य सुविधा तालुक्याच्या आदिवासी भागात निर्माण होण्याची नितांत गरज आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी वेगळे निकष आहेत. आदिवासी भाग असल्यामुळे शासनाच्या विशेष सवलतींचा लाभ महाविद्यालयाच्या उभारणीत होईल. त्यातून आदिवासी परिसरास विविध वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल असे अकोलेतील नागरिकांचे म्हणणे आहे.
अकोले तालुक्यात सरकारी जागा उपलब्ध आहे. तालुक्यात दोन धरणे असल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. कोल्हार-घोटी राज्य मार्ग तालुक्यातून जातो. समृद्धी मार्ग आणि पुणे-नाशिक हे महामार्ग तालुक्याच्या सीमेलगत आहेत. आदिवासी भाग असल्यामुळे केंद्र शासनाच्या आदिवासींसाठी असणाऱ्या योजनांमधून यासाठी आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकेल. आदिवासी भागाची गरज आणि विविध अनुकूल घटक लक्षात घेता हे वैद्यकीय महाविद्यालय अकोले तालुक्यातच होणे आवश्यक आहे.
विविध धरणे, वीजप्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोठा त्याग केला आहे. भंडारदरा निर्मितीपासून म्हणजे शंभर वर्षांपासून हे सुरू आहे. तालुक्याच्या या त्यागातून अंशतः उतराई होण्याची तसेच मोठ्या आदिवासी भागाची आरोग्यविषयक गरज भागविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याने वैद्यकीय महाविद्यालय अकोले तालुक्याला देऊन आदिवासी भागाची, त्यालगतच्या डोंगराळ भागाची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी केली जात आहे.
COMMENTS