नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, 2026 मध्ये जागतिक बेरोजगारी दर सुमारे 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, 2026 मध्ये जागतिक बेरोजगारी दर सुमारे 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ जगभरात सुमारे 18 कोटी 60 लाख लोक बेरोजगार असण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकांत रोजगाराच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी ती अपेक्षेइतकी समाधानकारक नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2015 ते 2025 या कालावधीत अत्यंत गरीबीत जगणार्या कामगारांचे प्रमाण केवळ 3.1 टक्क्यांनी घटले आहे. सध्या जगात सुमारे 28 कोटी 40 लाख कामगार रोज 3 अमेरिकी डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्नावर गुजराण करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कामगार दारिद्र्याचे प्रमाण वाढत असून, मध्यम गरीबीत जगणार्यांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. आयएलओच्या अंदाजानुसार, 2026 पर्यंत जगातील सुमारे 2.1 अब्ज लोक अनौपचारिक क्षेत्रात कार्यरत असतील. या कामगारांना रोजगाराची सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि मूलभूत कामगार हक्क अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. जागतिक पातळीवर रोजगारवाढीचा दर केवळ 1 टक्का राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरुणांच्या बाबतीत परिस्थिती अधिकच गंभीर आहे. सध्या 27.9 टक्के तरुण ना शिक्षण घेत आहेत, ना रोजगारात आहेत, ना कोणत्याही प्रशिक्षणात सहभागी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनच्या वाढत्या प्रभावामुळे, उच्च कौशल्य असलेल्या तरुणांसाठीही नोकरी मिळवणे भविष्यात अधिक कठीण होण्याची शक्यता आयएलओने व्यक्त केली आहे. महिला कामगारांच्या सहभागाबाबतही चित्र फारसे आशादायक नाही. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कामगार बाजारात सहभागी होण्याच्या संधी सुमारे 24 टक्क्यांनी कमी आहेत. जागतिक व्यापारातील अस्थिरतेचाही रोजगारावर परिणाम होत असून, व्यापाराशी निगडित रोजगाराचे प्रमाण एकूण जागतिक रोजगाराच्या 15.3 टक्के इतके आहे. प्रादेशिक पातळीवर पाहता, आशिया-पॅसिफिकमध्ये 2025 मध्ये बेरोजगारी दर 4.1 टक्के होता, तर चीनमधील शहरी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 17.8 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर, आयएलओचे महासंचालक गिल्बर्ट हौंगबो यांनी सरकारे, नियोक्ता आणि कामगार संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करताना, महिलां व तरुणांसाठी दर्जेदार आणि सुरक्षित रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS