अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण इंधनाचा मोेेठा पुरवठा हा

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्के बसतांना दिसून येत आहे. कारण इंधनाचा मोेेठा पुरवठा हा आखाती देशांतून होतो, त्यातच इराणवर हल्ले केल्यामुळे इराणने जगातील इंधनांच्या नाड्या आवळण्याची तयारी सुरू केल्यामुळे संपूर्ण जग हवालदिल होतांना दिसून यर्जीं आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराला देखील मोठे धक्के बसतांना दिसून येत आहे. देशातील वाढती अर्थव्यवस्था, परदेशी गुंतवणूक आणि नव्या गुंतवणूकदारांचा ओघ यामुळे बाजाराने अनेक विक्रम प्रस्थापित केले. परंतु आर्थिक क्षेत्रातील एक मूलभूत सत्य पुन्हा अधोरेखित झाले आहे-बाजारात वाढ जितकी वेगवान असते, तितक्याच वेगाने घसरणही होऊ शकते. अलीकडेच शेअर बाजारात झालेली मोठी पडझड याचीच जाणीव करून देणारी आहे. प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण होत गुंतवणूकदारांचे तब्बल नऊ लाख कोटी रुपयांचे मूल्य काही तासांतच कमी झाले. सलग दोन दिवसांच्या घसरणीमुळे एकूण नुकसान पंधरा लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचल्याचे चित्र दिसते.
ही केवळ आकड्यांची हालचाल नसून अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे प्रतिबिंब आहे. शेअर बाजार हा देशाच्या आर्थिक आरोग्याचा एक महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. त्यामुळे अशा घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु या घडामोडींच्या मागील कारणांचा विचार केला, तर ही परिस्थिती केवळ देशांतर्गत कारणांमुळे निर्माण झालेली नाही. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय घडामोडींचा त्यावर मोठा परिणाम झालेला दिसतो. सध्या मध्यपूर्वेतील वाढता तणाव हा जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरत आहे. तेलवाहू जहाजांवर झालेले हल्ले आणि त्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. भारतासारख्या आयातप्रधान देशासाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरते. कारण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की देशातील चलनफुगवटा वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्याचा परिणाम उद्योग, वाहतूक आणि उत्पादन क्षेत्रावर होतो. परिणामी गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात आणि शेअर बाजारावर दबाव वाढतो. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भूमिका हीही बाजारातील घसरणीचे एक महत्त्वाचे कारण ठरते. भारतीय शेअर बाजारात परदेशी निधीचा मोठा वाटा आहे. जेव्हा जागतिक स्तरावर अस्थिरता वाढते, तेव्हा हे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते उदयोन्मुख बाजारांमधून पैसा काढून घेतात. सध्या अशाच प्रकारची परिस्थिती दिसून येत आहे. काही दिवसांत हजारो कोटी रुपयांची विक्री झाल्यामुळे बाजारातील समतोल बिघडला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील धोरणात्मक निर्णयांचाही बाजारावर मोठा परिणाम होतो. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या व्याजदर धोरणाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले असते. व्याजदर वाढले तर डॉलर अधिक मजबूत होतो आणि जागतिक गुंतवणूक अमेरिकेकडे वळते. त्यामुळे इतर देशांच्या बाजारातून भांडवल बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते. सध्या याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झालेले दिसतात. मात्र या घडामोडींचा अर्थ असा नाही की भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. उलट दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर भारताची आर्थिक घोडदौड कायम आहे. पायाभूत सुविधांवरील मोठी गुंतवणूक, उद्योगधंद्यांमध्ये होत असलेली वाढ आणि वाढता ग्राहकवर्ग यामुळे भारत जगातील वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक मानला जातो. त्यामुळे शेअर बाजारातील अशा घसरणी तात्पुरत्या असतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. परंतु या परिस्थितीतून काही महत्त्वाचे धडेही मिळतात. गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकांनी अल्पकालीन नफ्याच्या अपेक्षेने मोठी गुंतवणूक केली. बाजार सतत वाढत राहील, असा समजही अनेकांच्या मनात निर्माण झाला. परंतु बाजाराचा स्वभावच चढउतारांचा आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे अत्यावश्यक असते. गुंतवणूक करताना विविध क्षेत्रांमध्ये संतुलित गुंतवणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व पैसा एका क्षेत्रात किंवा काही मोजक्या कंपन्यांमध्ये गुंतवणे धोकादायक ठरू शकते. कारण जागतिक परिस्थिती बदलल्यावर काही क्षेत्रांवर जास्त परिणाम होतो. सध्या स्टील, विमानवाहतूक किंवा संरक्षण क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण याचाच दाखला आहे. शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम केवळ मोठ्या गुंतवणूकदारांवरच होत नाही. आज मध्यमवर्गीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड किंवा थेट शेअर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे बाजारातील प्रत्येक चढउताराचा परिणाम त्यांच्या बचतीवरही होतो. म्हणूनच आर्थिक साक्षरता वाढविण्याची गरज आज अधिक प्रकर्षाने जाणवते. गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि जोखीम समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि नियामक संस्थांची भूमिकाही या संदर्भात महत्त्वाची ठरते. बाजारातील पारदर्शकता टिकवून ठेवणे, सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणे आणि गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित ठेवणे या बाबींची सतत काळजी घेतली गेली पाहिजे. आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. एकूणच पाहता, सध्याची बाजारातील पडझड ही जागतिक अस्थिरतेची प्रतिक्रिया आहे. परंतु प्रत्येक संकटात संधीही दडलेली असते. दीर्घकालीन दृष्टीकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी अशा काळात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स योग्य किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता असते. त्यामुळे घाबरून निर्णय घेण्याऐवजी संयम आणि विवेकाने परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
शेअर बाजाराचा इतिहास सांगतो की प्रत्येक घसरणीनंतर नव्या उभारीची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांनी बाजाराच्या चढउतारांना भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी आर्थिक शिस्त आणि दीर्घकालीन नियोजनावर भर दिला पाहिजे. कारण शेवटी बाजारातील अस्थिरता हीच गुंतवणुकीची खरी परीक्षा असते.

COMMENTS