मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शासकीय रुग्णालयातून रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार असून, तसा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. सध्या या सर्व रुग्
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील शासकीय रुग्णालयातून रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार असून, तसा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2.55 कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.
राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 नुसार आरोग्याचा नागरिकांना अधिकार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. गरीब आणि गरजू व्यक्तींना आपल्या आजारांवर उपचारासाठी पैसे नसतात. अशात काही कुटुंबातील तरुण तसेच लहान मुलांना देखील आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा गरजुंसाठी मंत्रिमंडळाने एकमताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य खात्याशी संबंधित हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 च्या अंतर्गत असलेल्या चांगल्या आरोग्यासह जगण्याचा नागरिकांना अधिकार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळत होते, ते आता 5 लाख रुपये करण्यात आले आहे. यानंतर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये पूर्णपणे नि:शुल्क करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात आरोग्य विभागाने प्रस्ताव बनवला होता, अखेर त्या प्रस्तावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे राज्यातील सर्वसामान्यांना आता मोफत उपचार मिळणे शक्य होणार आहे. राज्य सरकारची राज्यात 10 हजार 780 उपकेंद्रे तर 1906 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. 23 जिल्हा रुग्णालये आहेत, या सर्व रुग्णालयातून उपचार मोफत मिळणार आहेत.
COMMENTS