अहमदनगर : व्यावसायिकाने विश्वासाने पाठविलेले सुमारे १ लाख रूपये किंमतीची सरकी पेंड खाली करून घेत पैसे न देता व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना घ
अहमदनगर : व्यावसायिकाने विश्वासाने पाठविलेले सुमारे १ लाख रूपये किंमतीची सरकी पेंड खाली करून घेत पैसे न देता व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की राहूल पवार यांची छत्रपती जिनिंग प्रेसिंग ॲण्ड ऑईल मिल नावाची तेल गिरणी आहे. त्यांना रविवारी (दि. १५) दुपारी साडे तीनच्या सुमारास गुगळे याने फोन करून २०० बॅग सरकी पेंड मागितली. पवार यांच्याकडे माल शिल्लक नसल्याने त्यांनी त्यांच्याकडे कामास असलेला अनिकेत गणपत शिंदे यांच्या टेम्पोतून ७० बॅग गुगळे यांना पाठविल्या. दरम्यान, गुगळे याने शिंदे यांना फोन करून ६० बॅग चांदणी चौकात येणाऱ्या पिकअपमध्ये टाकण्यास सांगितल्या व उर्वरित १० बॅग शेंडी बायपास येथील किनारा हॉटेल येथे आणण्यास सांगितल्या व पैसे तेथे आल्यावर देतो, असेही कळविले.टेम्पो चालक शिंदे यांनी चांदणी चौकात आलेल्या पिकअप मध्ये (नंबर माहिती नाही) ६० बॅग टाकल्या. पिकअपमध्ये दोन ते तीन अनोळखी व्यक्ती होते. ते बॅग घेऊन सुप्याच्या दिशेने गेले.
शिंदे यांनी उर्वरित १० बॅग शेंडी बायपास येथील किनारा हॉटेलवर नेल्या. तेथील मालक, वेटर यांनी बॅग खाली करून घेतल्या व पैसेही दिले नाही.यावरुन आपली फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठले.
याप्रकरणी व्यावसायिक राहुल भारत पवार (वय ३०, रा. मिरजगाव ता. कर्जत) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महावीर ट्रेडर्सचा मालक दीपक गुगळे, शेंडी बायपास येथील हॉटेल किनाराचा मालक देविदास येवले, वेटर हरीराम बाबुराव उजागरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व पिकअप मधील दोन ते तीन अनोळखी यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार एम.टी. विधाते करीत आहेत.
COMMENTS