शिराळा / प्रतिनिधी : रेड, ता. शिराळा येथे मोटारसायकल व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल वरील एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे


शिराळा / प्रतिनिधी : रेड, ता. शिराळा येथे मोटारसायकल व चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल वरील एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गौतम कालिदास घाडगे (वय 35, रा. तुपारी वसाहत ताकारी, ता. पलूस) असे मयत व्यक्तीचे तर निलेश अर्जुन हत्तेकर (वय 26, रा. ताकारी, ता. पलूस) असे गंभीर जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवार, दि. 1 रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, निलेश हत्तेकर व मयत गौतम घाडगे हे मोटार सायकलवरून शिराळ्याकडून इस्लामपूरकडे जात होते. तर सुशांत गोरख गायकवाड हे चारचाकी गाडीमधून इस्लामपूरहून शिराळ्याकडे येत होते. यावेळी या दोन्ही गाड्यांची रेड हद्दीत समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटारसायकल वरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री साडे नऊच्या दरम्यान गौतम घाडगे यांचा मृत्यू झाला. यातील गंभीर जखमी निलेश हत्तेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत गौतम घाडगे हे सामाजिक कार्यकर्ते होते. ते अखिल भारतीय भटकी गोसावी युवक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, आठ भाऊ, चुलते, चुलती, असा परिवार आहे. याबाबत निलेश हत्तेकर यांनी वर्दी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार गणेश झांजरे हे करत आहेत.
COMMENTS