Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जाहीरनाम्यांची फॉरेन्सिक तपासणी; भाजपचा आरोप काँग्रेस ‘कॉपी-पेस्ट’, राष्ट्रवादी ‘फोटो-पेस्ट’!

नांदेड ः महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताच नांदेडच्या राजकारणात जाहीरनाम्यांची नव्हे, तर जुने कागद, उधारचे फोटो आणि वैयक्तिक टीकांची प्रदर्शने भर

नांदेड विकासाच्या दिशेने भाजपचा ठाम संकल्प
मुंबईत सत्ता कोण राखणार ?
राज्यसभेसाठी स्पर्धा तीव्र !

नांदेड ः महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताच नांदेडच्या राजकारणात जाहीरनाम्यांची नव्हे, तर जुने कागद, उधारचे फोटो आणि वैयक्तिक टीकांची प्रदर्शने भरू लागली आहेत. भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताच माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यांचा जणू राजकीय शवविच्छेदन अहवालच सादर केला.
भाजपचा जाहीरनामा म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट, तर विरोधकांचे जाहीरनामे म्हणजे भूलथापांचा गठ्ठा, असा उपरोधिक टोला लगावत सावंत म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला तर 2017 चा धूळखात पडलेला फाईल पुन्हा उघडून ‘कॉपी-पेस्ट’ करण्यात आला आहे. काळ बदलला, शहर बदलले, पण काँग्रेसचा जाहीरनामा मात्र तसाच आहे. हा जनतेच्या बुद्धीचा नव्हे, तर स्मरणशक्तीचा अपमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सावंत अधिकच धारदार झाले. 16 पानांचा जाहीरनामा असला तरी त्यातील सहा पाने विकासासाठी नाहीत, तर वैयक्तिक द्वेषासाठी राखीव आहेत. नांदेडसाठी आराखडा नसल्याने पिंपरी-चिंचवडचे फोटो उचलून आणले गेले. विकास नसेल तर निदान फोटो तरी भारी असावेत, ही राष्ट्रवादीची भूमिका दिसते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. मागील निवडणुकीतील सहा जागांचा उल्लेख करत इतिहास विसरून वर्तमानात स्वप्ने पाहण्याची ही कला आहे, असेही ते म्हणाले. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहराचे राजकारण पुन्हा एकदा जाहीरनाम्यांच्या रणांगणात उतरले आहे. विकासाचे मुद्दे, निधीचे श्रेय, भविष्याचा आराखडा यापेक्षा आता कोणाचा जाहीरनामा नवा आणि कोणाचा जुना यावरच राजकीय चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर करताच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यांवर टीकेची झोड उठवत राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे जाहीरनाम्यांचा आशय बाजूला पडून त्यातील मजकूर, फोटो आणि मांडणी यावरच संशयाचे बोट दाखवले जात आहे.
भाजपचा जाहीरनामा व्हिजन डॉक्युमेंट असल्याचा दावा केला जात असताना, विरोधकांचे जाहीरनामे मात्र दिशाभूल करणारे, कालबाह्य आणि वैयक्तिक टीकांनी भरलेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली केलेल्या घोषणांची सत्यता, त्यामागचा निधी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर प्रश्‍न उपस्थित होत असतानाच, कॉपी-पेस्ट राजकारण आणि उधारच्या विकासाचे फोटो हे शब्द नांदेडच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरू लागले आहेत. जाहीरनाम्यांमधून शहराचा उद्याचा नकाशा स्पष्ट होण्याऐवजी, राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांचे चित्र अधिक ठळक होत असून, निवडणूक लढत ही विकासापेक्षा विश्‍वास आणि विश्‍वासार्हतेच्या कसोटीवर जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. पत्रकारांनी विकासाच्या श्रेयावर बोट ठेवल्यावर भाजप नेत्यांची काहीशी कसरत पाहायला मिळाली. कामे काँग्रेसच्या काळात झाली असली, तरी निधी भाजप सरकारचा होता, त्यामुळे श्रेयही भाजपचेच, असा तर्क लावून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी चैतन्य (बापू) देशमुख व संतोष पांडागळे यांनी डॅमेज कंट्रोलची भूमिका निभावली.
शिवसेनेच्या भूमिकेवर बोलताना सावंतांनी दक्षिणेत युती, उत्तरेत संभ्रम असे चित्र रंगवत, विरोधकांचा एकमेव समान कार्यक्रम म्हणजे अशोकराव चव्हाणांवर टीका, असे उपहासाने नमूद केले. या पत्रकार परिषदेमुळे नांदेडच्या राजकारणात विकासापेक्षा जाहीरनाम्यांची तुलना, फोटोची तपासणी आणि जुन्या फाईलींची धूळ झटकण्याची स्पर्धा सुरू झाली असून, निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे हे राजकीय व्यंगनाट्य अधिकच रंगतदार होणार, हे मात्र नक्की.

COMMENTS