अंगावर फुले उधळून झाले बालगोपाळांचे स्वागत…शाळांची वाजली घंटा, मुलांचा किलबिलाट बहरला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगावर फुले उधळून झाले बालगोपाळांचे स्वागत…शाळांची वाजली घंटा, मुलांचा किलबिलाट बहरला

अहमदनगर/प्रतिनिधी : मोठ्या दादांची शाळा सुरू झाली, आमची कधी होणार, याचा लकडा सतत पालकांकडे लावणार्‍या प्राथमिक वर्गांतील बालगोपाळांच्या शाळेची घंटा अ

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे
राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : मोठ्या दादांची शाळा सुरू झाली, आमची कधी होणार, याचा लकडा सतत पालकांकडे लावणार्‍या प्राथमिक वर्गांतील बालगोपाळांच्या शाळेची घंटा अखेर बुधवारी वाजली. छानसा गणवेश परिधान करून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या अंगावर फुले उधळून व त्यांना औक्षण करून त्यांचे शाळांतून स्वागत करण्यात आले. मागील महिन्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांच्या शाळा आता नियमितपणे सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसर्‍या लाटेचे सावट व आता नव्याने ओमीक्रॉन या नव्या विषाणूची भीती यामुळे पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाची तयारी नव्हती. मात्र, दिवाळीची सुट्टी संपल्यावर प्राथमिक शाळा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले व त्यासाठी 1 डिसेंबरची तारीखही निश्‍चित करण्यात आल्याने बच्चेकंपनीमध्ये शाळेत जायला मिळणार म्हणून उत्साह होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी नव्या ओमीक्रॉन विषाणूच्या संकटामुळे मुंबई व पुण्यातील शाळा सुरू करण्याचा मुहूर्त 15 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्याने उर्वरित महाराष्ट्रात काय होते, याची उत्सुकता होती. पण नगर जिल्ह्यात बुधवारपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या. स्वच्छ गणवेशात आलेल्या मुलांच्या किलबिलाटाने शाळांचा परिसर गजबजून गेला.

शिशु संगोपनमध्ये स्वागत
बुधवारचा शाळेचा पहिला दिवस येथील शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करुन फुगे फोडून व मुलांवर पुष्पवर्षाव करुन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका योगिता गांधी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत तसेच सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका गांधी म्हणाल्या, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद होती. शासनाने वेळोवेळी नियम करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करुन अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात येत होता. आता शासनाच्या निर्देशानुसार शाळा पुन्हा सुरु झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून सर्व वर्गांची स्वच्छता करुन, सॅनिटायझेशन केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात आली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षाचा सर्व अभ्यासक्रम या कालावधीत पूर्ण करण्यास प्राधान्य राहील. जे विद्यार्थी शाळेत येवू शकत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यन, यावेळी शाळेच्यावतीने सर्व पालकांकडून संमतीपत्र घेण्यात आले. तसेच विद्यार्थी-पालकांना मास्क बंधनकारक करण्यात आले होते. येणार्‍या प्रत्येकाचे तापमान तपासून करुन प्रवेश देण्यात येत होता.

COMMENTS