जळगाव ः शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचे संकेत आहेत. भाजपने रावेरमधून त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपन
जळगाव ः शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचे संकेत आहेत. भाजपने रावेरमधून त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर रावेरमधून पवार गटातून एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे अशी पक्षाची इच्छा होती, मात्र सुन विरूद्ध असा सामना होऊ नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी माघार घेणे पसंद केले होते, मात्र आता एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याचे संकेत आहेत.
खडसे रविवारी अचानक राजधानीत दाखल झाले होते. त्यामुळे खडसे यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या प्रकरणी खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण त्यांच्या निकटवर्तीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मात्र जळगाव आणि रावेरमतदारसंघामध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण खडसे यांनी वेळोवेळी हीच चर्चा फेटाळून लावली. पण आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी सोडून भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची माहिती आहे. त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच होईल अशी माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वादामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. ते भाजपबरोबर गेले, पण खडसे यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले.
सुनेचा प्रचार करण्यासाठी भाजपमध्ये परतणार ? – एकनाथ खडसे यांच्या सुनेला म्हणजे रक्षा खडसे यांना यंदा भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल किंवा नाही याची शाश्वती नव्हती. कारण, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. पण भाजप श्रेष्ठींनी दिल्लीतून रक्षा यांची उमेदवारी निश्चित केली. तेव्हापासून रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसेंविरोधात भाजप पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही खडसेंवर आपल्या सुनेविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी दबाव वाढत होता. विशेषतः भाजपकडूनही रक्षा खडसे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परिणामी, सुनेला निवडून आणण्यासाठी खडसे यांना स्वतः मैदानात उतरण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून सुनेचा प्रचारही करता येत नव्हता. या सर्व प्रश्नांतून स्वतःची व सुनेची सुटका करण्यासाठी तथा रावेर लोकसभा मतदार संघात सुनेचा जाहीरपणे प्रचार करता यावा यासाठी एकनाथ खडसे यांनी भाजपत स्वगृही परतण्याचे संकेत आहे.
COMMENTS