नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपण पायउतार होण्यास तयार असून, आपला राजीनामा म

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपण पायउतार होण्यास तयार असून, आपला राजीनामा मंजूर करण्याची मागणी केली होती. अखेर कोश्यारी यांच्यासह लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल राधाकृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्याचबरोबर देशातील विविध राज्यांतील 13 राज्यपाल, उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्तावावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून राष्ट्रपती कार्यालयाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल असतील.बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1948 रोजी रायपूरमध्ये झाला. ते झारखंडचे दहावे आणि विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांनी जुलै 2019 ते जुलै 2021 पर्यंत त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणूनही काम केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण, पर्यावरण आणि वन या मंत्रालयांची धुरा सांभाळली आहे. ते 1989 आणि 1996-2019 या कार्यकाळात ते रायपूर मतदारसंघातून लोकसभेवर सलग सहा वेळा निवडून गेले. 1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.
राज्यपालांच्या नव्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, अरुणाचल प्रदेश राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक, सिक्किम राज्यपाल-लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंड राज्यपाल-सीपी राधाकृष्णन, हिमाचल प्रदेश राज्यपाल-शिवप्रताप शुक्ला, आसाम राज्यपाल-गुलाबचंद कटारिया, आंध्र प्रदेश राज्यपाल-निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, छत्तीसगड राज्यपाल-विश्वभूषण हरिचंदन, मणिपूर राज्यपाल-अनुसुईया उईके, नागालँड राज्यपाल-एल गणेशन, मेघालय राज्यपाल-फागू चौहान, बिहार राज्यपाल-राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, लडाख-लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (निवृत्त) बी.डी. मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील सर्व नेमणूका त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असतील, असेही पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोश्यारी यांचा कार्यकाळ ठरला वादग्रस्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 19 जानेवारी रोजीच्या मुंबई दौर्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते. राज्यपाल पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. कोश्यारी यांचा कार्यकाळ तसा वादग्रस्त झाला. त्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार अल्पावधीच्या सरकारचा शपथविधी, 12 राज्यपाल नियुक्त आमदार, शिंदे-फडणवीस सरकार, महापुरुषांबाबत वक्तव्ये आदी मुद्यांमुळे ते चर्चेत राहिले.
COMMENTS