अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणात बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्थ
अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणात बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करणार्याला अटक केली आहे. मुकेश चंद्रकांत कोरडे (वय 39, रा. गायके मळा, स्टेशन रस्ता, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटीची फसवणूक केल्याची फिर्याद नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत. सुरुवातीला पोलिसांनी सचिन गायकवाड (रा. कौडगाव ता. श्रीगोंदा) याला अटक केली. त्यानंतर कर्ज प्रकरणाचे गूढ बाहेर आले.
बँकेकडे तारण ठेवलेल्या सुमारे पाच मालमत्तांचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी आरोपी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे. हा बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट कोणी तयार केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. मुकेश कोरडे याने हा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाली. त्यामुळे पोलिसांनी कोरडे याला नगर शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. दरम्यान, आरोपी गायकवाड याच्याशी संबंधित कर्ज घेतलेल्या रकमेचा विनियोग झाला आहे. काही रकमा इतर कर्ज खात्यांमध्ये वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कर्ज खातेदार, संचालकांच्या जवळचे काही व्यक्ती व काही संचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
गायकवाडला जामीन नाकारला
नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकार्यांशी संगनमत करून बँकेची 150 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी सचिन गायकवाड याचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला व त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. तपासास सर्व सहकार्य करू, पोलिस बोलावतील त्यावेळी हजर राहू व न्यायालय ज्या अटी घालेल, त्या अटींचे पालन करू, असा युक्तिवाद गायकवाडच्यावतीने करण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे व ठेवीदारांचे मेहनतीचे पैसे अडकले आहेत. नियोजनबध्द केलेल्या या गुन्ह्यात सचीन गायकवाडला कोणी कोणी मदत केली व त्याने मोठ्यमोठ्या रोख रक्कमा कोणाला दिल्या, याचा तपास होणे बाकी आहे. त्यामुळे आरोपी कोठडीत असणे आवश्यक असल्याचे तपासी अधिकार्यांचे म्हणणे न्यायाधीश रेमणे यांनी ग्राह्य धरले व आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी मूळ फिर्यादी राजेंद्र गांधी व त्यांचे वकील अॅड. अच्युत पिंगळे तसेच आरोपी गायकवाडचे नातेवाईक उपस्थित होते.
COMMENTS