म्हसवड / वार्ताहर : क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातून लेझीम व ढोल-ता
म्हसवड / वार्ताहर : क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातून लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात प्रवेशोत्सव प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे क्रांतिवीर संकुलातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण म्हसवड शहरातून प्रवेशोत्सव फेरी काढून स्वागत करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर व संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोत्सव प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सव प्रभात फेरीमध्ये सजवलेल्या शैक्षणिक रथाच्या माध्यमातून शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. तसेच क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची उपक्रमशीलता दाखविण्यात आली. प्रवेशोत्सव फेरीमध्ये शिकेल तो टिकेल, पाणी आडवा पाणी जिरवा, पर्यावरण रक्षण हेच खरे मूल्यशिक्षण, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, पर्यावरण बचे तो प्राण बचे, जलसंरक्षण, प्रदूषण टाळा, झाडे लावा झाडे जगवा, चला चला शाळेला चला, जय जवान जय किसान, ऊर्जा संवर्धन व वृक्षारोपण काळाची गरज, शिक्षण काळाची गरज, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्ष आम्हा सोयरे, एक मुल एक झाड, पाणी म्हणजे जीवन, असे विविध संदेश फलकाद्वारे देण्यात आले. प्रवेशोत्सव फेरीमध्ये थोर व्यक्तींची वेशभूषा करून अनोखे संदेश देण्यात आले. संकुलातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, भारतीय सीमेवरील सैनिक, शेतकरी, आदिवासी असे विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. विविध पारंपरिक वेशभूषा ही प्रवेशोत्सव फेरीचे आकर्षण ठरले. यावेळी क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल, क्रांतिवीर जूनियर कॉलेज, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय या सर्व विभागात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून करण्यात आले.
यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे, राहुल फुटाणे, मुख्याध्यापक अनिल माने तसेच संकुलातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनोख्या स्वागतपर प्रभात फेरीमुळे मसवड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक पालकांनी या प्रभातफेरीच्या आयोजनाबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.
COMMENTS