मुंबई ः राज्य सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासोबत पा
मुंबई ः राज्य सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात रस्ते विकासासोबत पायाभूत सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील रस्त्याच्या विकासासाठी व रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे रस्ते विकासाला या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत केला जाईल. त्याचबरोबर विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी 22 हजार 225 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी 2 हजार 886 कोटी रुपयांची तरतूद, सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला 10 हजार 629 कोटी रुपये देण्यात येणार आहे. यासोबतच सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला 19 हजार 936 कोटी रुपये नियतव्यय तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत अॅन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 मधील 7 हजार 600 कोटी रुपये खर्चुन 7 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जान्नती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाचे भूसंपादन सुरू असून त्यात फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गाकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका 3 व 4 या रेल्वे मार्गाकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा 26 टक्के सहभाग- एकूण किंमत 76 हजार 220 कोटी रुपये निश्चित करण्यात आली. सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, 229 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे बांधकाम केले जाणार आहे. भगवती बंदर, रत्नागिरी-300 कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-111 कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-88 कोटी रुपये बंदर विकासाची कामे केली जाणार आहे. गृह-परिवहन, बंदरे विभागाला 4 हजार 94 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेसाठी भरीव तरतूद – अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या वर्षी सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आणि आगामी वर्षासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या विशेष तरतूदींचा लेखाजोगा सरकारसमोर मांडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं 1 लाख 1 हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे.
अयोध्या आणि जम्मूत उभारणार ‘महाराष्ट्र भवन’ – महाराष्ट्रातील नागरिकांची अयोध्येत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे अयोध्या तसेच जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाणार आहे. राज्य सरकारतर्फे अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवनाची उभारणी केली जाईल, असे अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. राज्यातील पर्यटक तसेच भाविकांना किफायतशीर दरात उत्तम सुविधा पुरवण्यासाठी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर तसेच श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने अतिशय मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेतल्या आहेत. या जागांसाठी 77 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
शिव सागरात उभारणार जागतिक दर्जाचे जल पर्यटन – सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवांना न्याय ः मुख्यमंत्री शिंदे – राज्यातील विकास कामांसाठी पुढील 4 महिन्यांत लागणार्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल, हे दर्शविणारा हा अर्थसंकल्प आहे. यात दुर्बल घटक, शेतकरी, महिला, युवा अशा सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राची 1 ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पुढे जाणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले. अयोध्या आणि जम्मू कश्मीर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय आणि त्यासाठी 77 कोटींची तरतूद ही देखील उत्साह वाढविणारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
उगाच टीका करू नका; अजित पवारांची फटकेबाजी – अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी विरोधकांना खडसावले. अर्थसंकल्पावर टीका करताना आधी विचार करा, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांचे कान खेचले. यासाठी त्यांनी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचाही वापर केला. वास्तविक ही कविता काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधिमंडळात सादर केली होती.
अजित पवार यांनी सादर केलेली कविता….
प्रकाश पेरा अपुल्या भवती,
दिवा दिव्याने पेटतसे…
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,
शंखच पोकळ फुंकू नका
भलेपणाचे कार्य उगवता
उगाच टीका करू नका
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच. तशा पाहिल्या तर त्या प्रतिक्रिया ठरलेल्या असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र त्यांनी आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडासा विचार करायला हवा, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
COMMENTS