श्रीलंका हा देश जेव्हढ्या कर्जामुळे आर्थिक डबघाईला आला तेवढ्या किंमतीत केवळ समाज माध्यम विकत घेणारे एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत समजलें जाता

श्रीलंका हा देश जेव्हढ्या कर्जामुळे आर्थिक डबघाईला आला तेवढ्या किंमतीत केवळ समाज माध्यम विकत घेणारे एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत समजलें जातात. परंतु, या महाशयांनी कंपनीचा ताबा घेतल्या – घेतल्याच कर्मचारी छटाईच सुरू केली, असं नाही, तर, कामाचे तास बारा पर्यंत वाढवून साप्ताहिक सुट्टी देखील रद्द केली. एवढं, सगळं करण्यामागे त्यांचा हेतू कर्मचारी कपात करून अधिक नफा कमविणे, हाच असला तरी, त्यांना प्रत्यक्षात नंतर साक्षात्कार झाला की, ज्या कर्मचाऱ्यांना आपण नोकरीवरून काढले, तेच खरेतर कंपनीला पैसा मिळवून देणारे घटक आहेत. त्यामुळे, त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना पुन्हा माघारी बोलावले. या घटनाक्रमात एलन मस्क यांचे वर्तन हे निखळ आणि मस्तवाल भांडवलशाहीचे दिसते. कामाचे आठ तास आणि साप्ताहिक सुट्टी हा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर कामगारांनी आपल्या न्याय्य आंदोलनातून मिळवलेला अधिकार आहे. हा अधिकार मोठ्या संघर्षातूनच मिळाला आहे. परंतु, त्या संघर्षाचा इतिहास न मांडणारी प्रसार माध्यमे ही एलन मस्कचीही बटीक झाल्याचे सध्या जगही अनुभव घेत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जग फॅसिझमपासून मुक्त झाले; परंतु, शितयुध्दात अडकले. नव्वदी नंतर म्हणजे कम्युनिस्ट रशियाचे पतन झाल्यानंतर जग एकतर्फी भांडवलशाहीच्या बाजूने झुकायला भाग पाडले गेले. अर्थात, लोकशाहीत भांडवलशाही ही उदारमतवादी असते. मात्र, एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने आदेशांचा रतिब चालवला आहे, ते पाहता जगातील सर्वच भांडवलदार याच दिशेने मार्गक्रमण करू इच्छित आहेत. यातून नुकसान भांडवलदारांचे होईल हे त्यांच्या गावी सुध्दा नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानसाला पुरेशी विश्रांती आणि मानसिक प्रसन्नता वाटणे गरजेचे मानले जाते. कारण, त्याशिवाय कामात निपुनता दिसत नाही. त्यामुळे, काॅर्पोरेट असणारे खाजगी भांडवलदारी जग हे वेगवेगळ्या सोयीसुविधा आपल्या आयटी कर्मचाऱ्यांना देऊ लागले. त्याचा परिणाम जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आयटी क्षेत्राच्या उद्योजकांचा मोठा भरणा झाला. आयटी कर्मचाऱ्यांना देखील यातून सुबत्ता आली. याठिकाणी याच आयटी कर्मचाऱ्यांच्या ज्ञानामुळे खोऱ्याने पैसा ओढणारे आयटी उद्योजक जगातील सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. या मालक-कर्मचाऱ्यांचे संबंध मार्क्स च्या भाषेत सांगायचे झाल्यास, आयटी कर्मचाऱ्यांच्या बौध्दिक श्रमातूनच आयटी उद्योजक किंवा नवभांडवलदारांना प्रचंड वरकड उत्पन्न मिळू लागले. ज्यातून त्यांच्या श्रीमंतीने जगाला दीपवून टाकले. मात्र, एक नक्की की, याच मालक वर्गाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरघोस पॅकेजमुळे इतर उद्योगधंद्यांना देखील भरभराट आली. अधिक उत्पन्न असणाऱ्या याच आयटी कर्मचाऱ्यांच्यामुळे गृह उद्योग, गाडी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज, एव्हाना ऍपल सारखे ब्रॅण्ड देखील याचमुळे येऊ शकले. अतिशय महागड्या वस्तुंचे उत्पादन करणारे उद्योग याच काळात भरभराटीस आले. यावर एलन मस्क यांनी चिंतन करण्याची गरज आहे. कारण जो कर्मचारी वर्ग पैसा कमावतो तो आपल्या गरजा क्वाॅलिटीटिव्ह पध्दतीने वाढवतो. परिणामी, अनेक उद्योगांची भरभराट झाली. बाजारपेठेत तेजी आली. कोणत्याही भांडवलदाराने या सूत्राचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कर्मचारी वर्गाला दिलेले जास्तीचे उत्पन्न यामुळे त्या संबंधित उद्योगाचे उत्पादन आणि उत्पन्न तर वाढतेच, परंतु, सर्व उद्योग जगताला त्याचा लाभ होतो. हे सूत्र लक्षात घेतल्यास एलन मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना दिलेल्या अमानवीय पॅकेजचा त्यांनीच पुनर्विचार करण्याची गरज आहे.
COMMENTS