Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्रात दिवाळीनंतरच निवडणूक !

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांची विधानसभा निवडणूक सोबत झाली होती. त्यामुळे यावेळेस देखील महाराष्ट्र जम्

आपचा राजकीय सूर !
अवकाळीच्या कळा !
वाढते हल्ले चिंताजनक  

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांची विधानसभा निवडणूक सोबत झाली होती. त्यामुळे यावेळेस देखील महाराष्ट्र जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यांची विधानसभा निवडणूक एकत्र होईल असे वाटत होते. मात्र निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात तर हरियाणाची एका टप्प्यात निवडणूक जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्रात असलेला पाऊस आणि सण, उत्सवांची वेळ असल्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक नंतर घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर  म्हणजे एका दशकानंतर जम्मू काश्मीर या राज्यात निवडणूक होत आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 2018 मध्ये या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2019 मध्ये मोदी सरकारने कलम 370 हटवत जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेत जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले होते. तेव्हापासून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूूक आयोगाला सप्टेंबरपर्यंत अखेरची मुदत दिल्यानंतर निवडणूक आयोगाने येथील निवडणुकीची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जस-जशी निवडणुकीची चाहूल लागली आहे, त्याचप्रमाणे या प्रदेशात दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या प्रदेशात केवळ 90 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदान 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात या निवडणूका होणार आहेत,

तर दुसरीकडे हरियाणात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र या निवडणुकीतून सध्यातरी वगळला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त होण्यासाठी अजून बराच अवधी आहे. म्हणजेच नोव्हेंबर महिना. शिवाय निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर 45 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यकर्त्यांची देखील दिवाळीआधी निवडणुका घेण्याची इच्छा नव्हती असेच दिसून येत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची खिचडी झाली असून, राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन पक्ष आणि शिवसेनेचे दोन पक्ष आणि काँगे्रस आणि भाजप असे प्रमुख सहा पक्ष दिसून येतात. महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये असे तीन पक्ष दिसून येतात. आज जर महाराष्ट्रात निवडणूक झालीस तर, महायुती आणि महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जर महायुतीला सत्ता मिळवायची असेल तर, त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाला सोबत घ्यावे लागते, किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करायची असल्यास त्यांना महायुतीतील एका घटक पक्षाला सोबत घेण्याची वेळ येवू शकते. यासोबतच मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे नवी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे. जर अशी आघाडी स्थापन झाल्यास ही आघाडी काही आमदार निवडून आणू शकते, मात्र यासोबतच ती इतर पक्षाला जोर का झटका देवू शकते. त्यामुळे मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षाचे टार्गेट कोण असेल, हे आज जरी सांगता येत नसले तरी, त्याचा मोठा फटका सत्ताधार्‍यांना बसू शकतो. कारण मनोज जरांगे यांनी म्हटले आहे की, आम्ही ते सत्तेत आहोत म्हणून त्यांना टार्गेट करतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचे सहजपणे पुढील लक्ष्य महायुती असणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच महायुती जरा सावध पावले टाकतांना दिसून येत आहे. लाडकी बहीण योजना हा त्यावरचा उतारा असेल की नाही, याचे भविष्य निवडणुकीत ठरणार यात शंका नाही.

COMMENTS