Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी

कोल्हापूर व पुण्यात एकाचवेळी कारवाई

पुणे/कोल्हापूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी सुरू केली. मुश्

गणेशखिंड रस्त्यावर मालवाहू वाहनांना मनाई
तैवानचा प्रश्न अमेरिका का उकरतेय!
अरे बापरे…ते 19 पोलिस सेवेत असून गायब…

पुणे/कोल्हापूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी सुरू केली. मुश्रीफ यांच्या पुणे येथील कार्यालयावर आणि कोल्हापुरातील कागल इथल्या निवासस्थानासह सात ठिकाणी सकाळी 6.30 वाजेपासून ईडीच्या 20 अधिकार्‍यांनी कारवाईला सुरुवात केली. कारवाईमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघतांना दिसून येत आहे. साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीकडून पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागिदार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र चंद्रकांत गायकवाड हे माझे भागीदार नाहीत, तसेच माझ्या जावयाचा देखील या कंपनीशी काहीही संबंध नाही असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर ईडीने बुधवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकले आहेत. आप्पासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भातील आरोप पूर्वीच फेटाळून लावले आहेत. याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले होते. परंतु, ईडीच्या अधिकार्‍यांनी हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी धाडी टाकल्या आहेत. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांना देखील ईडीच्या या कारवाईची पूर्वकल्पना नव्हती. या ठिकाणी बंदोबस्तात सहभागी झालेले सर्व पोलिस दिल्ली पोलिस दलातील आहेत.

यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. छापेमारी प्रकरणावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपाच्या काही नेत्यांनी खोटे आरोप केले. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई झाली. वास्तविक साखर कारखान्यात घोटाळा झाला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. पण त्यामध्ये काहीही तथ्य नाही. सर्व आरोप हे राजकीयरित्या प्रेरित आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला अडचणीत आणण्याचा कट-कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. ज्या पद्धतीने अनिल देशमुख आणि संजय राऊतांवर खोटे आरोप झाले, त्याप्रकारचे आरोप हसन मुश्रीफ यांच्यावरही करण्यात येत आहेत. परंतु, न्यायदेवतेकडून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल अशी आमची धारणा आहे, असे तपासे म्हणाले.

केवळ राजकीय द्वेषापोटी कारवाई ः हसन मुश्रीफ
चार वर्षापूर्वीच आमची चौकशी झाली आहे. तरीदेखील सकाळी सहा वाजेपासून माझ्यासह मुलाच्या, मुलीच्या, कारखान्यावर, पुण्यातील काही व्यक्तींच्या मालमत्तेवर छापा ईडीने धाड टाकली आहे. किरीट सोमय्या जे तक्रार करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही, बेनामी संपत्ती बाबत न्यायालयातून मला दिलासा मिळाला आहे. सत्ता येऊन सहा महीने झाले आहे तरी हे कशासाठी केले आहे काही कळत नाही. मुलीच्या सासूला, सुना आहे, नातवंड आहे, त्यांना भयभीत करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे, सत्ता आल्यानंतरही हे थांबत नाही याचे मला विशेष वाटते असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला टोला लगावला आहे.

COMMENTS