मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यात सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान राऊ
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यात सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान राऊत यांची चौकशी केली जाईल आणि ते त्यांच्या वकिलांना सकाळी ८.३० ते ९.३० या काळात भेटू शकणार आहेत. रविवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज, सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. त्यावेळी ईडीच्या वतीने वकील हितेन वेणेगावकर, तर राऊत यांच्या वतीने वकील अशोक मृंदरगी यांनी युक्तिवाद केला.
ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी म्हटले की, पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रविण राऊत फक्त नावाला होते. हे सगळे व्यवहार संजय राऊत यांनीच केले आहेत. त्यामुळे अधिक चौकशीसाठी राऊत यांची ८ दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली. राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे, असा दावाही ईडीचे वकील वेणेगावकर यांनी केला.
या सर्व प्रकरणात राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाला आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब आहे. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला. तसेच या प्रकरणात राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात.
राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने
राऊत यांची अटक ही राजकीय हेतूने आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रविण राऊत याला अटक करुन अनेक महिने झालेत. इतकी दिवस का कारवाई केली नाही. कारण ही कारवाई राजकीय हेतूने करायची होती, असा आमचा आरोप आहे. स्वप्ना पाटकर या महिलेशी काही कारणाने वाद झाले होते. त्याचा धागा पकडत हे आरोप करण्यात आले आणि ही कारवाई करण्यात आली.
वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले. जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बँक खात्याने घेतले असते का? घर घेतले असेल किंवा जमिन घेतली असेल सर्व पैसे कायदेशीररित्या चुकते केले. ते पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले होते. राऊत हे ईडी चौकशीला सहकार्य करत नाहीत हा आरोप खोटा आहे. जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावले तेव्हा तेव्हा ते चौकशीला गेले. पण गेल्या काही दिवसात चौकशीला बोलावले गेले, तेव्हा राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा निवडणूक आणि इतर निवडणूका होत्या ज्याबाबत माहिती ईडीला दिली गेली होती. तसेच राऊत हे हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी राऊत यांच्या वकिलांनी केली होती. दरम्यान राऊत हे हार्ट पेशंट असल्याने रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांची चौकशी करणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले आहे.
COMMENTS