गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या अर्थात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणांचे छापे वाढले आहे. अर्थात हे छापे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या अर्थात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणांचे छापे वाढले आहे. अर्थात हे छापे वाढण्यामुळे दहशतवाद्यांची छुपे स्लीपर इतर राज्यात देखील कार्यरत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे, त्यांना पैसा पुरवणे, सुरक्षित ठिकाण पुरवणे, त्यांना हव्या त्या बाबी पुरविण्याचे काम या सेलकडून करण्यात येतांना दिसून येत आहे. महाराष्ट्र, केरळ, हैदाबाद या ठिकाणांचा या दहशतवाद्यांकडून वापर करण्यात येतो. केंद्र सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी पीएफआय अर्थात पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा हात दहशतवाद्यांना आश्रय, निधी इतर बाबी पुरविण्यासंबंधी समोर आल्यामुळे या संघटनेवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक केले आहे. त्यानंतर पुण्यात इसिससंबंधीत एका डॉक्टरला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, गोंदिया येथुन देखील काही जणांना ताब्यात घेतले आहे. पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यापूर्वी, दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे महाराष्ट्रात पसरतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या संघटना अनेक सुशिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यांत ओढतांना दिसून येत आहे. पुण्यातून अटक केलेले असे डॉक्टर तरूणांची माथी भडकावण्याचे काम करतांना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात बघितले तर, हैदराबाद, केरळ सांप्रदायिकता वाढत चालली आहे. दहशतवादाचे कोणतेही कृत्य किंवा त्याला कोणत्याही स्वरूपात पाठिंबा देणे हा मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. आणि हा गंभीर गुन्हा या देशातील तरूण करतांना दिसून येत आहे. त्यांना रोखणे गरजेचे आहे. देशातील शांतता व समृद्धीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. एखाद्या देशाने दहशतवाद्यांना आश्रय दिला तर तो केवळ इतरांनाच नाही तर स्वतःलाही धोका निर्माण करतो. तरुणांना कट्टरवादी बनविणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेचे कारण तर आहेच, पण प्रगतीच्या मार्गातही मोठा अडथळा आहे. त्यामुळे तरुणांनी देखील सारासार विचार करण्याची गरज आहे. विवेक हरवू न देता, माथी भडकावणार्यांपासून दूर राहण्याची गरज आहे. दहशतवादाचे मूळ पाकिस्तानात आहे. पाकिस्तानला आज भीकेचे डोहाळे लागले आहे, तरीदेखील पाकिस्तान या दहशतवाद्यांचे तळ नष्ट करू शकला नाही. याविरोधात तेथील नागरिकांनीच जनआंदोलन छेडण्याची गरज आहे. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटनांनी आपले बस्तान बसवले आहे. तेथूनच सर्व कारवाया वाढत चालल्या आहेत. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आर्थिक मदत केली जाते त्याचा वापर दहशतवाद्यांना प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य आणि दहशतवादी गटांना पाठिंबा देण्यासाठी करण्यात येतो. त्यामुुळे पाकिस्तान आजही आपल्या देशांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करू शकलेल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तान जागतिक बँकेकेडे मदतीची याचना करतांना दिसून येत आहे. पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचा खराखुरा केंद्रबिंदू आहे, पाकिस्तानमध्ये दहशतवादाची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की ते बलुचिस्तान, सिंध आणि खैबर आणि आदिवासी क्षेत्रात स्वदेशवासींयाविरुद्धही त्याचा वापर करण्यास कचरत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरदेखील पाकिस्तान धडा घ्यायला तयार नाही. दहशतवाद हा भस्मासूर आहे. त्याला नेस्तनाबूत करणे शक्य नसले तरी, त्यावर दक्ष, सजग राहून नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आणि भारतीय लष्कराकडून, एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून यावर बारीक लक्ष देवून, या कारवायांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मूळात पाकिस्तानवर सर्वच देशांनी कडवा विरोध करून तेथील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी दबाब टाकणे गरजेचे आहे.
COMMENTS