सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. अंगप्रदर्श
सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. “श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी भावाना विनम्र आवाहन करण्यात येत आहे. येणाऱ्या भाविकांनी देवस्थानला सहकार्य करुन वस्त्रसंहितेचं पालन करावे. भाविकांनी फाटलेल्या जीन्स किंवा उत्तेजक कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये.” “आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू धर्माचं पालन करुन मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भाविकांना या निर्णयाविषयी माहिती नसेल त्यासाठी देवस्थान ट्रस्टतर्फे सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी पंचा, उपरणे, शाल असे साहित ठेवण्यात येणार आहे, जेणेकरुन कोणताही भाविक दर्शनाशिवाय मागे परतणार नाही. प्रत्येक भाविकाने या निर्णयाचं पालन करुन सहकार्य करावं,” असं देवस्थान ट्रस्टने म्हटलं आहे.
COMMENTS