डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणी निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर शिव

जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे
शिर्डी येथे ‘महापशुधन एक्सपो’ चे २४ ते २६ मार्च दरम्यान आयोजन
साखर सम्राटांपुढे निलेश लंकेंचे लोकसभेला आवाहन l Nilesh lanke l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणी निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयामध्ये आक्षेप घेतला आहे. जाधव यांनी या संदर्भात हरकती नोंदवत थर्ड पार्टी अर्ज न्यायालयामध्ये बुधवारी दाखल केला आहे. या अर्जावर सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिले आहेत. दरम्यान, डॉ. पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाच दिवसाची मुदत मागितली आहे. त्यामुळे जामीन अर्जासह जाधव यांच्या थर्ड पार्टी अर्जावर येत्या 23 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील आगीत जखमी झालेल्या लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय 60, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) यांचा उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मागील 6 नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11जण व बुधवारी आणखी एक मिळून अशा 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसात दाखल गुन्ह्यात चार महिलांना अटक झालेली आहे. त्यानंतर निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने तपासी अधिकारी यांना यासंदर्भामध्ये म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी डॉ. पोखरणा यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जाला आक्षेप घेत थर्ड पार्टी अर्ज दाखल केला आहे. पोखरणा यांचे वकील अ‍ॅड. पी.डी. कोठारी यांनी या अर्जाला आक्षेप घेत तुम्हाला थर्ड पार्टी अर्ज करता येणार नाही, तुम्हाला तो अधिकार नाही, असे म्हणणे त्यांनी मांडले. यावेळेला जाधव यांच्यावतीने वकील अ‍ॅड. अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयामध्ये या प्रकरणाबाबत दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आम्ही फिर्याद दिलेली आहे. सर्व वस्तुस्थिती आम्ही त्यामध्ये मांडलेली आहे. या प्रकरणासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल व्हावा, याकरता मागणी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोखरणा यांना जामीन देताना आमच्यासुद्धा म्हणण्याचा विचार करावा, असा अर्ज व काही पुरावे त्यांनी लेखी स्वरूपामध्ये न्यायालयामध्ये सादर केले. न्यायालयाने या संदर्भामध्ये आरोपींचे वकील व सरकारी वकील यांना म्हणणे मांडण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेली आहे.

पोलिसांनी मागितली मुदत
दुसरीकडे डॉ. पोखरणा यांना तात्पुरता स्वरूपामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे असून त्यांनी बुधवारी न्यायालयामध्ये आम्हाला या घटनेचा तपास करायचा आहे, तसेच काही कागदपत्रे सुद्धा आम्हाला हस्तगत करायची आहेत, त्यामुळे आम्हाला म्हणणे मांडण्यासाठी पाच दिवसांची मुदत द्यावी, असे लेखी पत्र न्यायालयामध्ये सादर केले. न्यायालयाने दिनांक 23 रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे.

जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग लागलेल्या आगीत जखमी झालेल्या एकाचा बुधवारी मृत्यू झाला, 6 नोव्हेंबरच्या घटनेत 11जणांचा मृत्यू झाला होता व अन्य सहा जण गंभीर जखमी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. यापैकी भाजून जखमी झालेल्या साठ वर्षीय रुग्णाचा बुधवारी दिनांक 17 सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मण आश्राजी सावळकर (वय 60 रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 12 झाली आहे. आग लागली त्यावेळी अतिदक्षता विभागात 17 करोना रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी 12जणांचा मृत्यू झाला असून, जखमी पाचजणांवर उपचार सुरू आहेत.

चौकशी अहवालाची प्रतीक्षा
जिल्हा रूग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी पोलिसांनी चार महिलांना अटक केली आहे. या आग प्रकरणात निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांच्यासह वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन स्टाफ नर्स यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे. या समितीमार्फत चौकशी सुरू आहे. तिच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत आहे. आगीच्या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पोलिस स्वत: फिर्यादी आहेत. पोलिसांनी जिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना यांना अटक केली आहे. जिल्हा रूग्णालय आग प्रकरणाच्या चौकशीसाठीच्या समितीत दहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीने नगरला येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात काही जणांची चौकशी केली. चौकशी समितीची मंगळवारी (दि.16) नाशिकलाही बैठक झाली. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. समिती चौकशी अहवाल शासनाला कधी सादर करतेे, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS